कशेळी ते अंजूर फाटा रस्ता खड्डेमय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कशेळी ते अंजूर फाटा रस्ता खड्डेमय
कशेळी ते अंजूर फाटा रस्ता खड्डेमय

कशेळी ते अंजूर फाटा रस्ता खड्डेमय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कशेळी ते अंजूर फाटा या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावर पडलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याची भीती नागरिकांसह वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्यावर मातीचा धुराळा उडत असल्याने श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ठाणे आणि भिवंडी भागात जाण्यासाठी कशेळी-अंजुर फाटा हा मार्ग असून या भागात मोठ्या प्रमाणात विविध साहित्यांची गोदामे आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. ही वाहनेही कशेळी-अंजुर फाटामार्गेच वाहतूक करतात. या मार्गावर ठाणे, भिवंडी, कल्याण अशी मेट्रो मार्गिका तयार करण्याचे काम सुरू असून त्यामुळे हा रस्ता अरुंद झाल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कशेळी ते अंजुर फाटा या भिवंडी ग्रामीण भागातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनांची चाके खड्ड्यात रुतत आहेत. त्यातून वाट चुकवित वाहनचालकांना प्रवास करताना वाहनांचा तोल जाऊन उलटण्याची भीती आहे.

...............................
नागरिकांना धुळीचा त्रास
पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे राडारोडा आणि काँक्रीटच्या साह्याने बुजविण्यात आले होते; मात्र, हे पुन्हा उखडल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्याचबरोबर सर्वत्र धूळ पसरली आहे. धूळ प्रदूषण आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

........................
१० मिनिटांसाठी अर्धा तास
खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून जागोजागी वाहतूककोंडी होत आहे. दहा मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पाऊस थांबून दहा ते १५ दिवसांचा कालवधी लोटला आहे. त्यामुळे आता तरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.