अखेरचा प्रवास यातनादायी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेरचा प्रवास यातनादायी
अखेरचा प्रवास यातनादायी

अखेरचा प्रवास यातनादायी

sakal_logo
By

वसई, ता. २ (बातमीदार) : वसई-विरार शहरातील बहुतांश स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. येथे ज्या सुविधा उपलब्ध असायला हव्यात त्या नसल्याने अखेरचा प्रवास यातनादायी ठरत आहे. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत असून स्मशानातही मरणयातना भोगत आहेत. पालिकेने नागरिकांची गैरसोई दूर व्हावी यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. नालासोपारा, विरार, वसई आणि नायगाव हद्दीत एकूण १०० हून अधिक स्म्शानभूमी आहेत. या स्मशानभूमींची देखभाल, दुरुस्तीसह इतर कामे करता यावी म्हणून दोन कोटी इतकी आर्थिक तरतूद शहरातील स्म्शानभूमीकरिता प्रशासनाकडून करण्यात आली आहे. नऊ प्रभागांत असलेल्या या स्मशानभूमींतील सुविधांसाठी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करते, पण त्यांच्या देखभालीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे या असुविधांचा त्रास मात्र मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना होत आहे. महापालिकेच्या स्मशानभूमी विभागाने याकडे लक्ष घालून या समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
अनेक ठिकाणी स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या आहेत, तर काही ठिकाणी पत्रे गायब, तर कुठे अंत्यविधीसाठी जाणारा रस्तासुद्धा व्यवस्थित नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विरार पूर्वेकडील फूलपाडा, पापाखिंड येथील स्मशानभूमीत लाकडे उपलब्ध नाहीत, तसेच तेथे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. याचबरोबर वाढलेली झाडी, स्वच्छतागृह सुविधांचा अभाव, अंत्यविधी जागा, नातेवाईकांना बसण्यासाठी आसनाची व्यवस्था नाही. विरार पश्चिम, तसेच वसई येथील वासळई, आगाशी, नाळे येथील स्मशानभूमीत सुविधांचा बोजवारा उडाला आहे.
......
भटक्या कुत्र्यांचा वावर
शहरात आलेल्या स्मशानभूमीत रोज स्वच्छता होणे गरजेचे आहे. अंत्यविधी कार्यासाठी अस्थी स्मशानभूमीत जाऊन आणावी लागते. मात्र स्मशानभूमी बंदिस्त नसल्याने भटक्या श्वानांचा वावर असतो. त्याचा त्रास मृतांच्या नातेवाईकांना होत आहे. तसेच महापालिकेकडून सुविधा मिळत आहे की नाही याची चाचपणी वारंवार होणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
--------------------
वसई-विरार शहरातील स्मशानभूमीच्या परिस्थितीबाबत संबंधित विभागाची आढावा बैठक घेण्यात आली आहे. त्यानुसार ज्याठिकाणी गैरसोय आहे, तिथे तात्काळ दुरुस्ती व सुविधा पुरविण्यात येतील.
- अनिल कुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका
---------------------
वसई-विरार शहरात मृत्यूनंतरदेखील त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानात सुविधांचा बोजवारा उडाला असून त्यामुळे नातेवाईकांना गैरसोय होत आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा केली, आढावा बैठक घेण्याचे सांगण्यात आले. महापालिकेने लवकरात लवकर निर्णय घेऊन सुविधा उपलब्ध कराव्यात.
- सुदेश चौधरी, माजी सभापती, स्थायी समिती महापालिका
-------------
वसई : शहरातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.