४० विकासकांना दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

४० विकासकांना दणका
४० विकासकांना दणका

४० विकासकांना दणका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगररचना विभागाची बनावट परवानगी कागदपत्र तयार करून रेराचे नोंदणी प्रमाणपत्र घेत काही विकसकांनी बेकायदा बांधकामे केली आहेत. याप्रकरणी शासनाची फसवणूक व बेकायदा बांधकाम करणाऱ्या ६५ विकासकांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करत विशेष तपास पथकाकडून याचा तपास केला जात आहे. याचा अधिक तपास करण्यासाठी मंगळवारी विशेष तपास पथक कल्याण-डोंबिवलीत दाखल झाले. या वेळी ४० विकासकांची विविध बॅंक खाती विशेष तपास पथकाकडून गोठवण्यात आली आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका तसेच २७ गावांत बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहेत. बनावट कागदपत्र सादर करत बांधकामधारकांनी रेराचे नोंदणी प्रमाणपत्र मिळवले. वास्तुविशारद संदीप पाटील यांनी माहितीच्या अधिकारात खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळाल्याचे भासवून रेराकडून बांधकाम प्रकल्पाचा नोंदणी क्रमांक विकासकांनी मिळवल्याची बाब उघडकीस आणली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने महापालिकेस फटकारले. त्यानंतर महापालिकेला जाग येऊन पालिकेने चौकशी सुरू केली. रेराने ६५ विकासकांना दिलेली नोंदणी प्रमाणपत्र रद्द केल्याने ही बाब उघडकीस आली. त्यानंतर पालिकेने याबाबत मानपाडा, रामनगर पोलिस ठाण्यांत तक्रारी दाखल केल्या. २०१९ ते २०२२ पर्यंत या विकासकांनी बेकायदा इमले बांधले आहेत. या बांधकामांसाठी पालिकेच्या बनावट परवानग्या तयार करण्यात आल्या. या कागदपत्रांच्या आधारे रेराची नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.


ईडीही करणार चौकशी
-----------------------
ईडीनेदेखील यात उडी घेतली असून, याचा तपास सध्या एसआयटीमार्फत सुरू असून विशेष तपास पथक कल्याण-डोंबिवलीत दाखल झाले आहे. विकासकांची कागदपत्रे, बॅंक खाती, परवानगी पत्र आदी गोष्टींचा तपास पथकाने सुरू केला आहे. यातील ४० विकासकांची विविध बॅंकांतील खाती गोठवण्यात आली असून उर्वरित २५ विकासकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. तसेच ही बनावट कागदपत्रे खरी आहेत, असे दस्त नोंदणीकरण कार्यालयात दाखवून ते काम डोंबिवलीतील एका स्टॅम्प वेंडरने केले असल्याची माहिती तपास पथकाच्या हाती लागली आहे.


----------------------
विकासकांचे जबाब घेतले जात आहेत. त्यांच्याजवळील कागदपत्रांची छाननी केली जात आहे. ४० विकासकांची बॅंक खाती गोठवली आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपास पथक पाहणी करत आहे.
- सरदार पाटील, सहायक पोलिस आयुक्त, तपास पथक प्रमुख, ठाणे गुन्हे शाखा