जव्हार तालुक्यात वातावरणाचा लपंडाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जव्हार तालुक्यात वातावरणाचा लपंडाव
जव्हार तालुक्यात वातावरणाचा लपंडाव

जव्हार तालुक्यात वातावरणाचा लपंडाव

sakal_logo
By

जव्हार, ता. १ (बातमीदार) : जव्हार तालुक्यात मागील सात ते आठ दिवसांपासून गुलाबी थंडीची चाहूल लागली असून, सकाळ व सायंकाळी वातावरणात गारवा जाणवत आहे. असे असतानाच तालुक्यात तापमान वाढणे अगर कमी होणे अशी परिस्थिती निर्माण होत आल्याने, पारा सातत्याने वर-खाली होताना दिसत आहे. रविवारी घसरलेला पारा सोमवारी (दि. ३१) वर चढलेला दिसला. यामुळे दिवसा उन्हाचे चटके व सायंकाळी थंडी असा निसर्गाचा खेळ चालू आहे.
यंदा पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे; तर ऑक्टोबर मध्यापर्यंत पावसाने बस्तान मांडले होते. सुदैवाने दिवाळीत पाऊस झाला नाही. त्यानंतर लगेचच दिवाळीत गुलाबी थंडीचा अनुभव येऊ लागला. रविवारी ३०.५ अंशावर असलेले कमाल तापमान सोमवारी ३०.८ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. तसेच किमान तापमान घसरून १६.८ अंश सेल्सिअसवर आले असतानाच सोमवारी ते चढून १७ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. यामुळेच सकाळी व सायंकाळी थंडी जाणवत असताना दिवसा मात्र उन्हाचे चटके बसत आहेत.

............................
बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम
तालुक्यात सर्वत्र वातावरणात बदल होताना दिसत आहे. सकाळी व सायंकाळी थंडी जाणवत असून कित्येकांनी आता गरम कपडेही काढले आहेत; तर दिवसा मात्र उन्हाचे चटके लागत असून मधेच गार वारा सुटू लागतो. एकंदर वातावरण ढवळून गेल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. यात सर्दी, खोकला व तापाचे प्रमाण वाढले आहे.