सेन्सेक्स ६१ हजार पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्स ६१ हजार पार
सेन्सेक्स ६१ हजार पार

सेन्सेक्स ६१ हजार पार

sakal_logo
By

मुंबई, ता. १ ः नोव्हेंबर महिन्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सने पुन्हा ६१ हजारांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय आर्थिक परिस्थिती चांगली झाल्याचे संकेत मिळत असल्याने आज चौफेर खरेदी झाली. सलग चौथ्या दिवशीही भारतीय शेअर बाजार निर्देशांक नफ्यात राहिले.

अमेरिकेत व भारतातही प्रमुख कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले आल्यामुळे आजही सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. बदलत्या परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदारांनीही मोठी खरेदी सुरू केली आहे. गेल्या सहा दिवसांत त्यांनी ९२ कोटी डॉलर मूल्याचे शेअर खरेदी केले आहेत. अशा अनुकूल वातावरणात आज निफ्टी १३३.२० अंशांनी वाढून १८,१४५.४० अंशावर; तर ३७४.७६ अंश वाढलेला सेन्सेक्स ६१,१२१.३५ अंशांवर स्थिरावला. निफ्टी यापूर्वी १८ जानेवारी रोजी या टप्प्यावर होता.

आज औषधनिर्मिती आणि धातूनिर्मिती कंपन्या तेजीत होत्या; तर सिमेंटची भाववाढ होण्याच्या अपेक्षेमुळे कंपन्यांचा नफा वाढेल या आशेने सिमेंट निर्मिती कंपन्यांचे शेअरही तेजीत होते. जागतिक बाजारातील अनुकूल परिस्थिती तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजारातही आज जोरदार खरेदी झाली. भारतात ऑक्टोबरमध्ये कंपन्यांचे उत्पादन चांगले झाल्याची आकडेवारी आल्यामुळे आजच्या तेजीला बळ मिळाले.
---
२६ शेअर नफ्यात
आज निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ३८ शेअर नफ्यात होते; तर सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी २६ शेअर नफ्यात होते. आज ॲक्सिस बँक पावणेचार टक्के घसरला; तर टाटा स्टील, मारुती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे शेअर काहीसे घसरले, पण दुसरीकडे डॉक्टर रेड्डीज लॅब, इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, सन फार्मा, एशियन पेंट, विप्रो, एचडीएफसी, अल्ट्राटेक सिमेंट या शेअरचे भाव दीड ते अडीच टक्के वाढले.