ठाणे अकादमीच्या बॅडमिंटनपटूंचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे अकादमीच्या बॅडमिंटनपटूंचे यश
ठाणे अकादमीच्या बॅडमिंटनपटूंचे यश

ठाणे अकादमीच्या बॅडमिंटनपटूंचे यश

sakal_logo
By

ठाणे, ता. २ : महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दुर्गम व आदिवासी भागातील गुणी खेळाडूंना मोफत बॅडमिंटनचे प्रशिक्षण दिले जाते. ही योजना गेली अनेक वर्ष राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत अनेक बॅडमिंटनपटूंनी आपली छाप विविध स्पर्धांमध्ये सोडली आहे. त्याचाच वारसा चंद्रपूरच्या वेदांत जवंजाळ, उज्वल नारद आणि जगन्नाथ रासेकर या तीन गुणी व अतिशय मेहनती खेळाडूंनी पुढे कायम ठेवला आहे.
नुकत्याच चंद्रपूर येथे झालेल्या गोंडवाना युनिव्हर्सिटी आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत आपल्या सर्वोत्तम खेळाचे सादरीकरण करून लोकमान्य महाविद्यालय, वरोरा या आपल्या संघाला ठाणेकर प्रशिक्षणार्थींनी विजय प्राप्त करून दिला आहे. १६ महाविद्यालयांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेत वेदांत जवंजाळ, उज्वल नारद आणि जगन्नाथ रासेकर या ठाण्यात प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी आपल्या खेळाच्या सादरीकरणाने सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले आहे.
पहिल्या सामन्यापासून वर्चस्‍व ठेवत त्यांनी राजेदरमाराव महाविद्यालय अल्लापल्ली या संघाचा २-० असा पराभव केला. पुढील सामन्यात मोहसीन भाई झवेरी कॉलेज यांचाही २-० असा पराभव करून उपउपांत्य फेरीत धडक मारली. या फेरीच्या लढतीत चंद्रपूरच्या बलाढ्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या संघाचा त्यांनी २-० असा धुव्‍वा उडवला आणि पदकाची सुनिश्चिती केली.
उपांत्य फेरीत अतिशय अटीतटीच्या सामन्यांमध्ये आयएसएमआर कॉलेजच्या टीमचा ३-१ असा पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम फेरीच्या लढतीत चारही सामने रोमहर्षक झाले. यात विजेतेपदासाठी हमखास दावेदार समजल्या जाणाऱ्या चंद्रपूरच्या सरदार पटेल लॉ कॉलेज या संघाच्या ठाणेकर प्रशिक्षणार्थींनी ३-१ असा धुव्‍वा उडवून अजिंक्यपदावर नाव उमटवले.

युनिव्हर्सिटी स्पर्धेतही प्रवेश
गोंडवाना युनिव्हर्सिटी स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संघाच्या निवड चाचणी स्पर्धेत देखील या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेनंतर लगेचच झालेल्या या चाचणीत वेदांत जवंजाळ आणि उज्वल नारद हे वरचढ ठरले आहेत. त्या दोघांनीही पुढे होणाऱ्या युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी संघात आपले स्थान पक्के केले आहे. या विजयात ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड तसेच मयूर घाटणेकर आणि अक्षय देवलकर हे गेली अनेक वर्ष घेत असलेल्या मेहनतीचा सिंहाचा वाटा असल्याचे या तीनही खेळाडूंनी नमूद केले आहे.