बोईसरमधील अवैध धंद्यावर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसरमधील अवैध धंद्यावर कारवाईची मागणी
बोईसरमधील अवैध धंद्यावर कारवाईची मागणी

बोईसरमधील अवैध धंद्यावर कारवाईची मागणी

sakal_logo
By

मनोर, ता. २ (बातमीदार) : बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात वाढत आहेत. अवैध धंदे करणारे माफिया पोलिसांना जुमानत नसल्याने राजरोसपणे मटका, जुगार, सट्टा यांसारखे अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप बोईसरच्या ग्रामपंचायत सदस्या पुष्पा धोडी यांनी केला आहे. अवैध धंद्यांवर कारवाईसाठी थेट पालघरच्या पोलिस अधीक्षकांना साकडे घातले आहे. याविषयी तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली आहे.
बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भंडारवाडा येथील दीपक ठाकूर यांच्या राहत्या घरात जुगार, मटका, सट्टेबाजी यांसारखे अवैध चालत आहेत. त्यांच्या विरोधात आवाज उठवणारे तसेच तक्रारदारांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप पुष्पा धोडी यांनी तक्रार अर्जात केला आहे. बोईसरच्या भंडारवाडा आणि रेल्वेस्थानकासमोरील मार्केटसारख्या गजबजलेल्या भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुण मोठ्या प्रमाणात नादी लागून कर्जबाजारी होऊन अनेक कुटुंबे उद्‍ध्वस्त होत आहेत.
धंदे सुरू असलेल्या ठिकाणालगत सेवा आश्रम शाळा असून याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असून विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जात आहेत. बोईसर पोलिसांना अवैध धंद्यांची माहिती असताना कारवाई होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्या पुष्पा धोडी यांनी कारवाईसाठी थेट पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना साकडे घातले आहे. कारवाईच्या मागणीचे पत्र पोलिस अधीक्षकांना दिले आहे. त्यामुळे अवैध धंद्यांविरोधात बोईसर पोलिसांच्या कारवाईकडे सुजाण नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.


..................
बोईसरमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे तरुणांना जुगाराचे व्यसन लागले आहे. कर्जबाजारीपणामुळे अनेकांचे संसार बुडाले आहेत. तरुण पिढी बरबाद होऊ नये यासाठी अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
- पुष्पा धोडी, ग्रामपंचायत सदस्या, बोईसर.

..................
कालच कर्तव्यावर हजर झाल्याने संबंधित पत्र मला मिळाले नाही. पत्राची माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंद्यांबाबतची माहिती घेऊन कारवाईचे निर्देश दिले जातील.
- बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, पालघर.