खारघरमध्ये वाघ आल्याची अफवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमध्ये वाघ आल्याची अफवा
खारघरमध्ये वाघ आल्याची अफवा

खारघरमध्ये वाघ आल्याची अफवा

sakal_logo
By

खारघर, ता. २ (बातमीदार) : खारघर डोंगरावर वाघ असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने पाड्यावर भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच डोंगरावर वाघ बघितल्याचा दावा किरण पारधी या ग्रामस्थाने केल्याने खारघर परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते; मात्र डोंगरावर वाघ नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केल्याने ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खारघर डोंगरावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीवर दोन वाघ असल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. त्यामुळे या परिसरात सकाळ-संध्याकाळी डोंगराच्या पायथ्याशी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे संदेश सोशल मीडियावर दिले जात आहे. अशातच चाफेवाडी पाड्यात वास्तव्य करणारे किरण पारधी या गृहस्थाने चार दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास घरी जात असताना हाकेच्या अंतरावरून वाघाला पाहिले असल्याचा दावा केल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते; पण पनवेल वन विभागाने मात्र ही शक्यता फेटाळली असून ही अफवा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वाघासंदर्भात व्हिडीओ आणि पसरणाऱ्या बातम्यामुळे पाडे आणि खारघर वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
-----------------------------------
दलाल मंडळींचा प्रताप
सिडकोकडून खारघर डोंगरावर बंगला, रो हाऊसची विक्री करणार आहे. पाड्यावरील ग्रामस्थ भीतीपोटी घर रिकामे करून दुसरीकडे वास्तव्यास जातील म्हणून अशा प्रकारचे कृत्य काही दलाल मंडळींकडून केले जात असावे, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
--------------------------------------
खारघर डोंगरावर संरक्षण भिंतीवर वाघ असल्याचे जे व्हिडीओ व्हायरल होत आहे, ती संरक्षण भिंत खारघर डोंगरावरील नाही. तसेच अधिकाऱ्यांसमवेत डोंगरावर पाहणी केली असता, रस्त्यावर आणि डोंगरावर कुठेही ठसे आढळून आले नाहीत.
- जनार्दन काळे, कर्मचारी, वन विभाग, खारघर