दुतर्फा पार्किंगचा अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुतर्फा पार्किंगचा अडथळा
दुतर्फा पार्किंगचा अडथळा

दुतर्फा पार्किंगचा अडथळा

sakal_logo
By

वडाळा, ता. २ (बातमीदार) ः वडाळा पश्चिम येथील रफी अहमद किडवाई मार्गावरील नॅशनल मार्केटसमोरील परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच पदपथावर अनधिकृत पार्किंग करण्यात येत आहे. यामुळे येथे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढीस लागली आहे. मात्र ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना राबविण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून येथील पार्किंग हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
वाढत्या वाहनाच्या तुलनेत पार्किंगची जागा अपुरी पडत असल्याने अनेक वाहनचालक रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करताना दिसतात. वडाळ्यातील रफी अहमद किडवाई मार्ग चार रस्ता हा वर्दळीचा मार्ग असल्याने येथे सकाळी व सायंकाळी कामाच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यात नॅशनल मार्केटसमोरील परिसरात अनधिकृत वाहनांची रस्त्यावर तसेच पदपथावर दुतर्फा बेशिस्त पार्किंगमुळे येथे वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच पादचाऱ्यांच्या हक्काच्या पदपथावर वाहने उभी केल्याने पादचाऱ्यांना चालण्यास जगाच उरत नाही. परिणामी पादचाऱ्यांना रोज तारेवरची कसरत करीत रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे अनेकदा अपघातही होतात. त्यामुळे वाहनांना शिस्त लागावी, यासाठी या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी पादचाऱ्यांनी केली आहे.

ठोस कारवाईची गरज
शाईन दरबार ते रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाणे येथील पदपथापर्यंत २००८ पासून रस्तारुंदीकरणाचा प्रस्ताव आहे. मात्र अद्याप रस्तारुंदीकरण करण्यात आलेले नाही. याच मार्गावर येणाऱ्या नॅशनल मार्केटसमोरील परिसरात बेशिस्तपणे दुचाकी व चारचाकी वाहने पदपथ व रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी करत असल्याने पादचाऱ्यांना चालण्यास तर इतर वाहनांना धावण्यास जागाच उरत नाही. तसेच पदपथावरील वाहनांमध्ये बसून रात्रीच्या वेळी वाहनांच्या आड नशा करणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन पदपथावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर पालिकेने कारवाई केल्यास पदपथ मोकळे होऊन पादचाऱ्यांना चालण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी मागणी समाजसेवक सिद्धीक शेख यांनी केली आहे.

अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्यांनवर कारवाई करण्यात येते; मात्र सध्या येथे रस्ता व पदपथाचे काम नव्याने करण्यात येत असल्याने पार्किंगच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली नाही; परंतु लवकर कारवाई करून रस्ता व पदपथ मोकळे करण्यात येईल.
- स्नेहल जाधव, रस्ता अभियंता, पालिका एफ–दक्षिण विभाग

नॅशनल मार्केटसमोरील अनधिकृत डबल पार्किंगवर वाहतूक विभागाच्या वतीने दररोज कारवाई करण्यात येते. अनेकदा या कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो; तरीही बेशिस्त चारचाकी व दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येते.
- प्रशांत मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, भोईवाडा