मंनोरंजनासाठी वंडर्स पार्क सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंनोरंजनासाठी वंडर्स पार्क सज्ज
मंनोरंजनासाठी वंडर्स पार्क सज्ज

मंनोरंजनासाठी वंडर्स पार्क सज्ज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ ः शहरातील बच्चेकंपनी आणि आबालवृद्धांचे आवडते ठिकाण असलेल्या नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये महापालिकेतर्फे नवी खेळणी बसवली जात आहेत. त्यात स्मार्टकार्डद्वारे खेळता येईल, अशी अत्याधुनिक खेळण्यांचा समावेश असून नवीन वर्षात वंडर्स पार्कमधील मनोरंजनाचा नवा हंगाम सुरू होणार आहे.
नवी मुंबईतील नागरिकांसाठी महापालिकेने सुरू केलेले वंडर्स पार्क अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. जगभरातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृतीमुळे वंडर्स पार्कमध्ये नेहमीच नवी मुंबईकरांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. अशातच वंडर्स पार्कमध्ये बसवलेली खेळणी आणि टॉय ट्रेन जुनी झाल्याने नव्या खेळण्यांची गरज होती. पावसाळ्यात वंडर्स पार्क नागरिकांसाठी बंद केले जाते. तसेच खेळणीदेखील झाकली जात होती; मात्र जुन्या झालेल्या या खेळण्यांमुळे अपघाताची शक्यता वाढल्याने गेल्या वर्षांपासून अभियांत्रिकी विभागातर्फे २३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून वंडर्स पार्कमध्ये नवीन खेळणी बसवली जात आहेत. त्यात स्काय व्हील, स्काय कॉपर, स्काय स्विंगर, स्काय कॉप्टर, रॉकिंग बिट्स, वॉर्म कॉस्टर आणि ढम्पर कार अशी अत्याधुनिक प्रकारातील नवीन खेळण्यांचा समावेश असून बच्चेकपंनीसोबत मोठ्यांसाठीही आकर्षण ठरणार आहे.
------------------------------
सुशोभीकरणाला गती
नव्या खेळण्यांसोबत खराब झालेले काँक्रीटीकरणाचा भागही नव्याने करण्यात येत आहे. यासाठी पार्कमधील ८ हजार ९०० चौरस मीटर क्षेत्रफळावरच्या जागेवर काँक्रीटीकरण केले जात आहे. उद्यानातील कारंजाच्याही दुरुस्तीचे काम सुरू असून यासाठी अभियांत्रिकी विभागाला किमान एक महिन्यांचा वेळ लागणार आहे. तसेच काम पूर्ण करण्याकरिता २४ जानेवारी २०२३ पर्यंत मुदत अभियांत्रिकी विभागापुढे असल्यामुळे वंडर्सपार्कचे लोकार्पण नवीन वर्षात होण्याची शक्यता अधिक आहे.
---------------------------------
स्काय व्हील
आकाशाला गवसणी घालणाऱ्या स्काय व्हील आणि स्काय स्विंगरमध्ये प्रत्येकी २० जणांची आसनक्षमता आहे. स्काय कॉपर, रॉकिंग बिट्स आणि स्काय कॉप्टरमध्ये २४ जणांना बसता येईल. वॉर्म कॉस्टरमध्ये शंभर; तर ढम्पर कारचा आनंद चार जणांना घेता येणार आहे.
-------------------
नवीन टॉय ट्रेन
वंडर्स पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या टॉय ट्रेनचाही कायापालट होणार आहे. पूर्वीची टॉयट्रेन जुनी झाल्यामुळे त्या जागी नवीन टॉयट्रेन बसवली जाणार आहे. ही टॉय ट्रेन संपूर्ण उद्यानाला फेरफटका मारून येत असल्यामुळे संपूर्ण उद्यानाची सफर घडणार आहे.