Mumbai : वाहतूक विभागाने कारवाई करून आणलेली वाहने रस्त्यावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai
कारवाईतील वाहने रस्त्यावरच

Mumbai : वाहतूक विभागाने कारवाई करून आणलेली वाहने रस्त्यावरच

कांदिवली : कांदिवली पूर्वेला द्रुतगती महामार्गाच्या ठाकूर संकुलसमोरील उड्डाणपुलाखाली दहिसर व समतानगर वाहतूक विभाग चौकी आहे. वाहतूक विभागाने कारवाई करून आणलेली वाहने कित्येक महिने रस्त्यावरच धूळ खात उभी असल्याने चौकीच्या बाजूचा मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. यामुळे बाजूच्या एकेरी मार्गावर वाहनचालकांना कसरत करूनच प्रवास करावा लागत आहे.

कांदिवली पूर्वेला द्रुतगती मार्गावर सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. उड्डाणपुलाखाली दहिसर आणि समतानगर वाहतूक विभाग आहे. बाजूने मेट्रो रेल्वेचे पिलर असल्याने बोरिवलीकडे जाणाऱ्या मार्गाचे दोन अरुंद मार्ग झाले आहेत. त्यातील उड्डाणपूल चौकीच्या बाजूच्या मार्गावर वाहतूक विभागाने कारवाई केलेली वाहने रस्त्यावरच धूळ खात उभी असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांना, नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सामाजिक कार्यकर्ते समीर सारंग यांनी सांगितले की, कुंपणानेच शेत खाल्ले, तर बोलणार कोणाला? बऱ्याच दिवसांपासून उभ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा तर होतोच; शिवाय दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

न्‍याय मागायचा कुठे?
ठाकूर संकुल, समतानगर, ठाकूर व्हीलेज मार्गावरून येणारी वाहने द्रुतगती मार्गावर असलेल्या उड्डाणपुलाखालून इच्छितस्थळी जातात. ज्या वाहतूक विभागाकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची अपेक्षा असते, त्याच विभागाने चक्क रस्त्यावरच बस्तान मांडल्याने न्याय मागायचा कोणाकडे, अशी चर्चा वाहनचालकांमध्ये होत आहे.

जागेचा अभाव आहे. कारवाई केलेल्‍या वाहनांतील काही वाहने नेली आहेत; तर काही वाहने तांत्रिक अडचणींमुळे रखडली आहेत. लवकरच ती वाहनेही नेण्यात येतील.
– सोमेश्वर कामठे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग