अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्त आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्त आक्रमक
अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्त आक्रमक

अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्त आक्रमक

sakal_logo
By

वसई, ता. २ (बातमीदार) : वसई-विरार शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरोधात आयुक्त अनिलकुमार पवार यांनी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार प्रभागात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांना प्रभागातील सहायक आयुक्तांना जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभागात अनधिकृत बांधकामांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीत इमारती, चाळी, कारखान्यांच्या शेडसह वाणिज्य वापरासाठी गाळे मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहेत; पण यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले जात आहे. न्यायालयानेदेखील अनेकदा वसई-विरार शहरातील अनधिकृत बांधकामांवरून पालिकेला जाब विचारला आहे. त्यामुळे आयुक्तांनी आपले लक्ष अनधिकृत बांधकामांकडे वळवले असून त्यावर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार भागात उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळींवर कारवाई करून त्या पाडण्यात आल्या आहेत.
महापालिकेचे नऊ प्रभाग आहेत. यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांनी अनेक बांधकामे उभारली आहेत. काही महिन्यांपूर्वी वसई पूर्वेला दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू झाला. या ठिकाणी डोंगरपायथ्याशी चाळी उभारल्याचे समोर आले. यामुळे पालिकेने कारवाई करत काही ठिकाणी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. तसेच नोटीसही बजावण्यात आली; मात्र पुन्हा अनधिकृत बांधकाम करणारे डोके वर काढू लागले आहेत.
--------------------
‘रोज अहवाल सादर करा’
एकीकडे स्वप्नातील घर मिळावे म्हणून सर्वसामान्य नागरिक घर खरेदी करतात; परंतु अनधिकृत चाळी, इमारतीत त्यांना घर मिळते आणि त्यांची फसवणूक होते; तर काहींनी शक्कल लढवत ग्राहक आकर्षित करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यासदेखील सुरुवात केली आहे; पण याला आळा घालण्यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी आता थेट रोज कारवाई करा व अहवाल सादर करा, असे निर्देश दिले आहेत.
-----
कारवाईला वेग
आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रभाग समिती बी, सी, एफ व जी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध गाळ्यांवर, खोल्यांवर तसेच इमारतींवर कारवाई करण्यात येत आहे. एकाच वेळी चार प्रभागात कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त अजित मुठे यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार या प्रभागांमध्ये कारवाई करण्यात आली.

-------------------
शहरातील अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी दररोज कारवाई व लक्ष ठेवण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच बिट चौक्या उभारल्या असून प्रभागातील सहायक आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, महापालिका, वसई-विरार