पर्यायी पार्किंग व्यवस्था करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यायी पार्किंग व्यवस्था करा
पर्यायी पार्किंग व्यवस्था करा

पर्यायी पार्किंग व्यवस्था करा

sakal_logo
By

कल्याण, ता. ३ (बातमीदार) : शहरातील पार्किंग समस्या गंभीर होत असून चालकांना वाहने उभी करण्यासाठी सुनियोजित जागा नसल्याने हाल होत आहे. त्यामुळे कल्याणमध्ये वाहने पार्किंग करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशा मागणीचे पत्र कल्याण वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिले आहे. नागरिकांच्या तक्रारीकडे अनेकदा दुर्लक्ष झाल्यानंतर पोलिसांच्या मागणीनंतर पालिका कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

कल्याण पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेर महात्मा फुले चौक ते वलीपीर रोड या परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध विकासकामे होणार आहे. त्यामुळे वाहन पार्किंग करण्यास जागा अपुरी पडत आहे. आता १ नोव्हेंबरपासून नो पार्किंग आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅनमार्फत कारवाई सुरू केल्याने नागरिकांनी वाहने उभे कुठे करायची, असा सवाल केला जात आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, स्थानक परिसरात वाहने पार्किंगसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत इमारती आणि अन्य ठिकाणी उपाययोजना सुरू असून ते लवकरच उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टेनिस कोर्ट, राम बाग परिसरात रेल्वे आणि महापालिकेच्या जागेत वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे पत्र वाहतूक विभागाने महापालिकेला पाठविले आहे.
- महेश तरडे, वरिष्ठ निरीक्षक, कल्याण वाहतूक पोलिस