Mumbai : कांद्याची अर्धशतकाकडे वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion
कांद्याची अर्धशतकाकडे वाटचाल

Mumbai : कांद्याची अर्धशतकाकडे वाटचाल

वाशी : दिवाळीनंतर राज्यभर कांदा दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक मार्केटमध्ये कांद्याची २४ ते ३४ रुपये किलो दराने विक्री होत आहे; तर किरकोळ मार्केटमध्ये ४० ते ५० रुपये किलो दराने विकला जात असल्याने लवकरच अर्धशतक गाठण्याची शक्यता आहे.

दिवाळीच्या दरम्यान राज्यभर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चाळींमध्ये साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून प्रतिदिन ८० ते ९० ट्रक, टेम्पोमधून कांदा विक्रीसाठी येत आहे. आवक होणाऱ्या कांद्यामध्ये खराब मालाचे प्रमाण जास्त आहे. सडलेला कांदा फेकून द्यावा लागत आहे. यामुळे उपलब्ध मालाला चांगला बाजारभाव मिळत आहे. मुंबई बाजार समितीमध्ये एका आठवड्यापूर्वी घाऊक दर १४ ते २४ रुपये होते. मात्र, आता हेच दर किलोमागे २४ ते ३४ रुपये झाले आहे.

बटाटाही तेजीत
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक आठवड्यापूर्वी बटाटा १५ ते २१ रुपये दराने विकला जात होता. आता हेच दर १७ ते २४ रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये बटाटा ३० रुपयांवर पोहोचला आहे.

पावसामुळे चाळीतील माल खराब झाला आहे. नवीन कांदा डिसेंबरमध्ये मार्केटमध्ये येईल. यामुळे पुढील काही दिवस कांदा मार्केटमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे.
- अशोक वाळुंज, संचालक, कांदा-बटाटा मार्केट