ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट
ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट

ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २ : मागील दोन ते अडीच वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असल्याचे दिसून येत होते. त्यानुसार पालिकेच्या तिजोरीवर त्याचा परिणाम झाला होता. त्यात मालमत्ता कर आणि शहर विकास विभागाने कर वसुलीवर दिलेला भर यांमुळे खर्चाचा ताळमेळ बसविण्यात पालिकेला यश आले आहे. दुसरीकडे यंदा दिवाळीच्या दिवसात ठेकेदारांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने पालिकेने ठेकेदारांची सुमारे ३५ कोटींची थकीत बिले अदा झाल्याने त्याचा परिणाम पुन्हा पालिकेच्या तिजोरीवर झाल्याचे दिसून आले आहे. पालिकेच्या तिजोरीत सध्याच्या घडीला अवघे १५ ते २० कोटीच शिल्लक असल्याने त्याचा परिणाम विकास कामांवर देखील होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर परिणाम झाल्याचे दिसून आले होते. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्यात पालिकेला यश आले नव्हते. त्यामुळे पालिकेने नव्या प्रकल्पांना कात्री लावताना जुन्या प्रकल्पांची कामे थांबविली होती. मालमत्ता कर आणि पाणी देयकांची वसुली वगळता इतर विभागांची अपेक्षित कर वसुली झाली नव्हती. यामुळे कोरोना काळात मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा विभागाने पालिकेच्या तिजोरीला हातभार लावला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर आता कुठे पालिकेच्या तिजोरीत लक्ष्मी दर्शन होऊ लागले आहे. त्यात यंदा कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पालिकेची मालमत्ता आणि पाणीपट्टीची वसुलीही चांगल्या पद्धतीने झाली. यामुळे पालिकेच्या तिजोरीलाही काही प्रमाणात उभारी मिळाली होती. त्यामुळे दिवाळीच्या आधी पालिकेच्या तिजोरीत १०० कोटींच्या आसपास शिल्लक रक्कम होती; परंतु आता पुन्हा तिजोरीला गळती लागल्याचे दिसत आहे. दिवाळीच्या कालावधीत ठेकेदारांची दिवाळी गोड करण्यासाठी पालिकेने सुमारे ३५ कोटींची देणी दिल्याने त्याचा परिणाम थेट पालिकेच्या तिजोरीवर झाल्याचे दिसून आले आहे. दिवाळीत कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या व्यतिरिक्त सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जरी गोड झाली असली तरी पालिकेच्या तिजोरीवर मात्र त्याचा फटका बसला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
--------------------------------------
अनुदानावरच भवितव्‍य
सध्याच्या घडीला पालिकेच्या तिजोरीत १५ ते २० कोटी इतकीच रक्कम शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे विकासकामे करताना पालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. उत्पन्नाचा व खर्चाचा ताळमेळ कशाप्रकारे बसविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे राज्याकडून आलेल्या अनुदानावर आता पालिकेला अवलंबून राहावे लागण्याची वेळ आली आहे.
.....................................
मागासवर्गीय निधी, प्रभाग सुधारणा निधी
मागासवर्गीय निधी देण्यासोबतच फेब्रुवारी २०२१ पर्यंतचीही बिले देखील देण्यात आली. याशिवाय प्रभाग सुधारणा निधी मिळत नसल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारी होत्या. त्यामुळे २५ टक्के प्रभाग सुधारणा निधीचेही वाटप करण्यात आले आहे. तसेच घनकचरा विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या स्वच्छता विभागातील कर्मचारी, गार्डन विभाग आणि अन्य संबंधित विभागातील लेबरचे वेतन देखील अदा करण्यात आले आल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर झाल्याचे दिसून येत आहे.