‘रील मास्टर’ने पोलिसांची मागितली माफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रील मास्टर’ने पोलिसांची मागितली माफी
‘रील मास्टर’ने पोलिसांची मागितली माफी

‘रील मास्टर’ने पोलिसांची मागितली माफी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ ः चोळेगाव येथे राहणाऱ्या सुरेंद्र पाटील याने मानपाडा पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून रील व्हिडीओ बनवला. तो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळाली; परंतु या प्रसिद्धीच्या मोहापायी त्याला तुरुंगाची हवा खावी लागली. याच रील मास्टर सुरेंद्रने मानपाडा पोलिसांची माफी मागितली असून तो व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
ठाकुर्ली परिसरात राहणारा बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील ऊर्फ चौधरी हा मानपाडा पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणातील आपली रक्कम आणण्यासाठी गेला होता. या वेळी पोलिसांच्या खुर्चीवर बसून रील बनविण्याचा त्याला मोह झाला. कार्यालयात कोणी अधिकारी नसताना त्याने रील व्हिडीओ बनविला. तो इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रचंड व्हायरल झाला. मानपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच सुरेंद्रविरोधात गुन्हा दाखल करीत मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली होती. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रील बनवून तो प्रसिद्ध झाला; परंतु या प्रसिद्धीच्या मोहापायी त्याला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.
सुरेंद्रचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सुरेंद्रने कार्यालयात कोणी पोलिस कर्मचारी नसताना आपण व्हिडीओ बनविला आहे. माझ्याकडून ही चूक झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा माझा हेतू नव्हता. माझी चूक झाल्याचे मी मान्य करतो, असे सुरेंद्रने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.