वसईत वायू प्रदूषणाचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत वायू प्रदूषणाचा विळखा
वसईत वायू प्रदूषणाचा विळखा

वसईत वायू प्रदूषणाचा विळखा

sakal_logo
By

वसई, ता. (बातमीदार) : सध्या वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. वसई तालुक्यात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अनेक वाहनचालक नियमांना बगल देत वाहने चालवत आहेत. अशातच वायू प्रदूषणदेखील होत आहे; परंतु प्रशासनाकडून याबाबत डोळेझाक केली जात असल्याने प्रदूषणाचा विळखा घट्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वसई, नालासोपारा, नायगाव व विरार ही मोठी शहरे आहेत. नागरीकरण वाढत असल्याने त्यामानाने वाहनांचा उपयोगदेखील जास्त वाढत आहे. शहरात औद्योगिक व नागरी अशी संमिश्र वस्ती आहे. वाहनांतून कार्बन मोनाक्साईड, हायड्रो कार्बन असे विषारी वायू मोठ्या प्रमाणात सोडले जातात. यावर रोख आणण्यासाठी वाहनांना प्रदूषण तपासणी पत्र म्हणजे पीयूसी बंधनकारक करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांतूनदेखील प्रदूषणाचा धूर निघत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक विभागाने याकडे लक्ष न दिल्यास वसई तालुक्यात वायू प्रदूषणाला खतपाणी मिळेल व प्रदूषण वाढत राहील.

-----------------------
वाहनांनी कोणती काळजी घ्यावी
वाहनांच्या इंधनातून धूर निघत असेल तर वाहनांची तपासणी करावी. सर्व्हिसिंगदेखील नियमित होणे गरजेचे आहे. त्यामुळे वायू प्रदूषणाला रोखणे शक्य होणार आहे. त्यामुळे आपल्या व नागरिकांच्या आरोग्याला इजा निर्माण होणार नाही.

-------------------
पीयूसीचा फायदा कोणता ?
विषारी वायू हवेत मिसळून प्रदूषण निर्माण होऊ नये यासाठी पीयूसीचा फायदा असतो. दहा हजार किलोमीटर अंतर चालणाऱ्या वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. यासाठी ठिकठिकाणी पीयूसी केंद्रदेखील उभारण्यात आली आहेत.

--------------------
हिरवाईचा धोका
वाहनांतून निघणारा विषारी वायू केवळ मानवी शरीरावर नव्हे तर वृक्षांनादेखील धोकादायक आहे. वसई तालुक्यातील मार्गावर वृक्षांची लागवड केली जाते; मात्र हवेत मिसळणारा वायू वृक्षांवर परिणाम करू शकतो. त्यामुळे जर पर्यावरण वाचवायचे असेल तर विषारी वायूवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

वाहनातून विषारी वायूचे प्रदूषण होऊ नये म्हणून पीयूसी तपासणी बंधनकारक आहे. याबाबत वाहतूक व उपप्रादेशिक विभाग चाचपणी करत असते. त्याचबरोबर जर मोठ्या प्रमाणात धूर निघत असेल तर पीयूसी केंद्रात संबंधित वाहनांची तपासणी करून योग्य ती कार्यवाही केली जाते.
- दशरथ वाघुले, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभाग