रुग्णालयाच्या भूखंडांवरुन नवा वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णालयाच्या भूखंडांवरुन नवा वाद
रुग्णालयाच्या भूखंडांवरुन नवा वाद

रुग्णालयाच्या भूखंडांवरुन नवा वाद

sakal_logo
By

जुईनगर, ता. २ (बातमीदार)ः बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांमुळे नेरूळ येथे सिडकोतर्फे महापालिकेला देण्यात येणाऱ्या भूखंडांवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सिडकोने हा भूखंड महापालिकेला मोफत द्यावा, पैसे भरून भूखंड मिळवणारे काही लोक पालिकेच्या तिजोरीवर डाका टाकत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या भाजपच्या जिल्हा महामंत्री विजय घाटे हे भगत यांच्या सिडकोच्या संचालक कारकिर्दीत झालेल्या निर्णयांची आणि कमावलेल्या मालमत्तेची चौकशीची मागणी राज्य सरकारकडे करणार आहेत.
नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून नेरूळ येथे सिडकोच्या भूखंडावर मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांमधून सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारले जात आहे. तो भूखंड पैसे देऊन खरेदी करण्यास भगत यांनी विरोध केला आहे. तसेच मंदा म्हात्रे यांचे नाव न घेता दलाली करणे, डाका टाकणे, नाटक करणे असे शब्द वापरून भाजपवर आरोप केले. या आरोपांविरोधात भाजपतर्फे विजय घाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन भगत यांचा चांगलाच समाचार घेतला. एखाद्या महिला लोकप्रतिनिधीबाबत बोलताना सभ्यता व पातळी ठेवावी, अशा शब्दांत घाटे यांनी कान टोचले. दलाल म्हणून महापालिकेचे आयुक्त व सिडकोचे एमडी यांचा उल्लेख केला काय, असा सवालही घाटे यांनी उपस्थित केला. जनतेच्या पैशांवर कोण डाका टाकत आहे, हे सिद्ध करून दाखवण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नामदेव भगत यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे घाटे यांनी सांगितले. तसेच माणगाव, मुरबाड आणि दिघोडे येथील फार्महाऊसची मालमत्ता कुठून आली, याचीही चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले.
-------------------------------------
काय आहे प्रकरण ?
आमदार मंदा म्हात्रे यांच्या अविरत पाठपुराव्यामुळे नेरूळ येथे सुमारे साडे आठ एकरचा भूखंड सिडको महापालिकेला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, महाविद्यालय आणि डॉक्टर क्वार्टरसाठी देणार आहे. त्याबदल्यात सिडकोने बाजारभावानुसार सुमारे १०७ कोटी रुपये महापालिकेकडे मागितले होते. मात्र, म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून तब्बल ५८ कोटी माफ करून फक्त ४९ कोटी रुपयांत भूखंड उपलब्ध केले आहे. पण आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून अनेक नेते मंडळी स्वतःची पोळी भाजण्यासाठी भूखंडाबाबत काही नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
--------------------------------------
मी कोणाचेही नाव घेऊन दलाली हा शब्द प्रयोग केलेला नाही. महापालिकेची निवडणूक लढवताना शपथपत्रात सर्व मालमत्तेचा उल्लेख केला आहे. त्यावरून संबंधितांनी माहिती घ्यावी. माझ्याविरोधात केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. ज्यांना चौकशी करावी वाटते, त्यांनी खुशाल चौकशी करावी.
- नामदेव भगत, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस