मुंबईतील २५०० टॅक्सींचे रिकॅलिब्रेशन पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील २५०० टॅक्सींचे रिकॅलिब्रेशन पूर्ण
मुंबईतील २५०० टॅक्सींचे रिकॅलिब्रेशन पूर्ण

मुंबईतील २५०० टॅक्सींचे रिकॅलिब्रेशन पूर्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : परिवहन विभागाने मीटर रिकॅलिब्रेशनच्या सूचना देऊनही महिनाभर संबंधित कंपन्यांनी त्याची सुरुवात केली नव्हती. अखेर परिवहन आयुक्तांनी कंपन्यांची बैठक घेऊन आधीच घोषित केलेल्या ५०० रुपये दरात रिकॅलिब्रेशन करण्याचे आदेश दिल्यानंतर कार्यवाहीला वेग आला आहे. मुंबईत सुमारे २६ हजार टॅक्सी आहेत. त्यांपैकी २५०० टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन करण्यात आले आहे.

राज्य सरकारने नुकतीच रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ केली. रिक्षाचे भाडे दोन रुपयांनी वाढवले. टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे नव्याने मीटर रिकॅलिब्रेशन करणे अनिवार्य आहे. मात्र, त्याची सुरुवात झाली नव्हती.

मुंबईतील प्रादेशिक परिवहन आरटीओअंतर्गत सुमारे दोन हजार टॅक्सींच्या मीटरमध्ये सॉफ्टवेअर टाकून त्याची तपासणी करण्यात आली आहे. परिवहन अधिकाऱ्यांनी ५०० टॅक्सींची प्रत्यक्ष रस्त्यांवरील मीटर भाडेतपासणी केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी (मुंबई सेंट्रल आरटीओ) भरत कळसकर यांनी दिली. पूर्ण मुंबई महानगरात एकूण सुमारे ५० हजार टॅक्सी आहेत. रिक्षांची संख्या चार लाखांपेक्षा जास्त आहे. परिणामी १०० टक्के वाहनांचे रिकॅलिब्रेशन होण्यासाठी वेळ लागणार आहे.

वडाळा आरटीओअंतर्गत एकूण ८० हजार रिक्षा आहेत. १० हजार टॅक्सी आहेत. त्यांपैकी १३ हजार रिक्षा आणि २ हजार टॅक्सींचे रिकॅलिब्रेशन पूर्ण करण्यात आले आहे. ठाणे आरटीओअंतर्गत एकूण रिक्षांची संख्या ८६ हजार आहे. त्यांपैकी सुमारे चार हजार रिक्षांचे मीटरमधील नवीन भाड्याचे रिकॅलिब्रेशन करण्यात आले आहे.

बनावट दरपत्रक ओळखता येणार
रिक्षा-टॅक्सीचे १०० टक्के मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण होईपर्यंत परिवहन विभागाने नवीन भाड्याचे दरपत्रक जारी केले आहे. प्रवाशांना त्यानुसार भाडे देता येणार आहे. बनावट दरपत्रकही ओळखता येणार आहे. दरपत्रकावर एक बारकोड देण्यात आला असून, त्यावर स्कॅन केल्यास ते खरे की खोटे याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.