दशावतार रंगभूमी संकटात : राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Theater day
दशावतार नाट्य महोत्सव

दशावतार रंगभूमी संकटात : राज्य सरकारने लक्ष देण्याची मागणी

मुंबई : कोकणात रुजलेली आणि कायम लोकाश्रयामुळे टिकून राहिलेली दशावतार रंगभूमी संकटात सापडली आहे. या रंगभूमीला नीट राजाश्रय मिळत नसल्याने आणि त्यासाठी योग्य पावले उचलली जात नसल्याने असंख्य कलावंतही उपेक्षित राहिले आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने तरी सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच दशावतार रंगभूमीबाबत मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीमध्ये स्वतंत्र अभ्यासक्रम घ्यावा, अशीही मागणी केली जात आहे.

कोकणातील गावागावांमध्ये दशावतार रंगभूमी रुजलेली आहे; परंतु अलीकडील काळात या रंगभूमीची वाताहात होत असून सरकारकडून योग्य मदत आणि सहकार्य मिळत नसल्याने हे कलावंत उपेक्षित राहिले आहेत. शिवाय या रंगभूमीसाठी सरकारचे कोणतेही मोठे अनुदान अथवा मदतही मिळत नसल्याने अनेक दशावतार मंडळे यासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.

असंख्य कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामध्ये मृत्यू झालेल्या अनेक कलावंतांना मदतही मिळू शकली नाही. परिणामी या कलावंतांची होत असलेली आर्थिक उपेक्षा थांबवावी, कोकणातील दशावतार मंडळे कलावंत यांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मंडळ स्थापन करावे, अशी मागणी लोककला अभ्यासक डॉ. महेश केळुस्कर यांनी केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी यावर लक्ष द्यावे, अशीही त्यांनी मागणी केली.

दशावतारी मंडळांबाबत...

कोकणात प्रामुख्याने ११ ते १५ प्रमुख दशावतार मंडळे आहेत. त्यामध्ये खानोलकर, पार्सेकर, चेंदवणकर गोरे, आजगावकर, आरोलकर, गोरे भट कंपनी, दिनेश मोचेमाडकर, सुधीर कलिंगण कलेश्वर आदी दशावतार मंडळांचा समावेश होतो, तसेच अनेक तालुक्यांत स्थानिक दशावतार मंडळी असून त्यामध्ये सुमारे दोन हजाराहून अधिक कलावंत आपली कला सादर करतात. लावणी, तमाशासोबतच अलीकडे वारकऱ्यांनाही कलावंत समजून सरकारकडून अनुदान दिले जाते; परंतु शतकानुशतके आपली लोककला जतन करणाऱ्या दशावतार कलावंत मात्र उपेक्षित राहिल्याची खंत दशावतार कलावंतांकडून व्यक्त करण्यात आली.

दशावतार ही कोकणातील पारंपरिक कला आहे. कालौघात दशावतार कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या कलेला ऊर्जितावस्था यावी म्हणून विविध उपाय करण्याची गरज आहे. त्याबाबत शासन सकारात्मक निर्णय योग्य वेळी घेईल.

- सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीमध्ये दशावतार या कला प्रकारावर अभ्यासक्रम शिकवला जातो. विविध तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. कोरोनामुळे थांबलेले दौरे आता पुन्हा ते सुरू केले जाईल.

- डॉ. गणेश चंदनशिवे, संचालक, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ