अधिकाऱ्यांचा कर्तव्यशून्यतेमुळे निष्पाप कामगारांचे बळी; अंबादास दानवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambadas Danve
अधिकाऱ्यांचा कर्तव्यशून्यतेमुळे निष्पाप कामगारांचे बळी

अधिकाऱ्यांचा कर्तव्यशून्यतेमुळे निष्पाप कामगारांचे बळी; अंबादास दानवे

मनोर : कंपन्यांची वकिली करू नका, स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला न्याय देण्याचे काम करा, असा सज्जड दम विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना दिला.

अधिकारी काम करीत नसल्याने औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये स्फोट आणि अपघात होत असून यात निष्पाप कामगारांचे बळी जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बुधवारी (ता. २) तारापूर औद्योगिक वसाहतीमधील स्फोटात जखमी झालेल्या कामगारांची विचारपूस करण्यासाठी दानवे आज तारापूर औद्योगिक वसाहतीच्या दौऱ्यावर आले होते.

औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया कंपनीत झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला; तर बारा कामगार गंभीर जखमी झाले होते. दानवे यांनी बुधवारी जखमी झालेल्या कामगारांची भेट घेतली. सायंकाळी साडेचार वाजता दानवे यांनी रुग्णालयात जाऊन श्रावण दास या जखमी कामगाराची भेट घेत त्याची विचारपूस केली.

जखमी कामगारांना चांगले उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना केल्या. औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केल्यानंतरही माहिती दिली जात नसल्याची तक्रार पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी या वेळी केली.

कामगारांची बाजू घ्या!

दुर्घटनाग्रस्त कारखान्याला भेट देत अंबादास दानवे घटनास्थळाची पाहणी केली. स्फोटामागची कारणे जाणून घेतली. अधिकाऱ्यांना कंपनीची बाजू न घेता सर्वसामान्य कामगारांची बाजू घेण्याची तंबी दिली. अधिकाऱ्यांच्या उत्तराने संतप्त झालेल्या दानवेंनी स्फोटातील कामगारांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तुमच्यावर का दाखल करू नये, असा सवाल करत माहिती घेऊन दोष आढळल्यास कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

दोन आठवड्यात अहवाल

कंपनी झालेल्या स्फोटानंतर दुर्घटनाग्रस्त रिॲक्टर आणि रसायनाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दोन आठवड्यात अहवाल येणार असल्याचे सांगत त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे क्षेत्र अधिकारी अमोल बाईत यांनी दिली.