गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ ः ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी विरोधी पक्षनेते आणि शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या डॉन असा उल्लेख केल्यामुळे शिंदे गटाच्या नवी मुंबईतील नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. अशा पद्धतीने टीका करून नाईक युतीधर्म पाळत नसल्याची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली जाणार आहे. आज शिंदे गटाच्या नेरूळ येथील मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपनेते विजय नाहटा यांनी दिली.
ऐरोली येथील सेक्टर १ येथे १५ मीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. या कामात शेजारच्या देशमुख वाडीतील १७ घरांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून ऐरोलीतील एका नेत्याच्या सांगण्यातून महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी रस्तारुंदीकरणाचे क्षेत्रफळ वाढवल्याचा आरोप माजी नगरसेवक अनंत सुतार यांनी केला आहे. याबाबत गणेश नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे तक्रार केली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना नाईक यांनी ऐरोलीतील त्या नेत्याचा डॉन असा उल्लेख केला. नाईकांच्या या वक्तव्याचा धागा धरून नवी मुंबईतील शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली. नवी मुंबईतील भाजपचे नेते शिंदे गटातील नेत्यांसोबत सौजन्याने वागतात; पण नाईकांकडून तसे सौजन्य पाळले जात नाही. गरज नसतानाही आमच्या नेत्यांवर अशा प्रकारचे केलेले शब्दप्रयोग आम्ही खपवून घेणार नाही. नाईकांकडून असे वारंवार होत असल्यामुळे त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहोत. वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी नाईकांना समजवावे, असे विजय नाहटा यांनी सांगितले.
...
काय बोलले गणेश नाईक?
त्याला सांगा, निरोप द्या, एका डॉनसाठी काम करू नको. तुला डॉन पगार देत नाही, नवी मुंबईच्या जनतेच्या करातून पगार मिळतो. डोंट वरी, जोपर्यंत गणेश नाईक आहे, तोपर्यंत एकाही घराला हात लावू देणार नाही.
...
एखाद्याच्या बोलण्याचा संदर्भ वेगळ्या पद्धतीने काढू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांची झालेली युती नवी मुंबईतील काही नेतेमंडळींना बघवत नाही. त्यामुळे ते या ना त्या कारणांनी तक्रारींचा सूर आळवत असतात. त्यांच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही.
- संदीप नाईक, माजी आमदार, भाजप