- वॉटर टॅक्सी प्रकल्प फेल- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

- वॉटर टॅक्सी प्रकल्प फेल-
- वॉटर टॅक्सी प्रकल्प फेल-

- वॉटर टॅक्सी प्रकल्प फेल-

sakal_logo
By

हायस्पीड वॉटर टॅक्सीकडे मुंबईकरांची पाठ!
भाऊचा धक्का ते बेलापूरदरम्यान अवघे ९१ प्रवासी

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : चहूबाजूंनी निळाशार समुद्र आणि उसळणाऱ्या लाटांच्या सान्निध्यात मुंबईकरांना समुद्रसफारीचा मनमुराद आनंद लुटता यावा, याकरिता फेब्रुवारी २०२२ पासून हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. पावसाळा वगळून गेल्या पाच महिन्यांत ४ हजार ३९९ प्रवाशांनी त्यातून प्रवास केला. मात्र, त्यात मुंबईकर प्रवाशांची संख्या केवळ ९१ असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. हायस्पीड वॉटर टॅक्सीला एलिफंटा आणि नेरूळमध्ये प्रतिसाद मिळाला असला तरी मुंबईकरांनी मात्र न परवडणाऱ्या तिकीट दरामुळे तिच्याकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीवरून दिसते.

केंद्र आणि राज्य सरकार जलवाहतुकीला चालना देण्यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे. भाऊचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते एलिफंटा आणि बेलापूर ते नेरूळ मार्गावरील त्यासाठी वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील सेवेला पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाऊचा धक्का ते बेलापूरदरम्यान मात्र प्रवासी संख्या कमी असल्याने ‘६० सीटर’ हायस्पीड वॉटर टॅक्सी बंद पडली आहे. इतर मार्गांवरील वॉटर टॅक्सी सेवाही बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

फेब्रुवारी ते जून २०२२ दरम्यान भाऊचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते एलिफंटा आणि बेलापूर ते नेरूळ मार्गावर हायस्पीड वॉटर टॅक्सीच्या ३८९ फेऱ्या झाल्या. त्यातून ४ हजार ३९९ पर्यटकांनी आणि प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे बेलापूर ते एलिफंटा ३,८९९ आणि बेलापूर ते नेरूळ मार्गावर ४०९ प्रवाशांनी प्रवास केला. मुंबई ते बेलापूरदरम्यान फक्त ९१ प्रवाशांनी वॉटर टॅक्सीतून प्रवास केला आहे. मुंबई-बेलापूर दरम्यानची टॅक्सी प्रवाशांच्या शून्य प्रतिसादामुळे काही दिवसांतच बंद पडली. आता १ नोव्हेंबरपासून भाऊचा धक्का ते मांडवा २०० आसन क्षमतेची अत्याधुनिक हायस्पीड वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली आहे; मात्र तिकीट जास्त असल्याने प्रवाशांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे.


ग्राफिक्स
महिना वॉटर टॅक्सी फेऱ्या प्रवासी
- फेब्रुवारी ३७ ४०२
- मार्च १२१ १२०२
- एप्रिल ६० ६५०
- मे १२८ १६१६
- जून ४३ ५२९
- एकूण ३८९ ४,३९९

प्रवासी संख्या
- बेलापूर ते एलिफंटा ः ३८९९
- बेलापूर ते नेरूळ ः ४०९
- मुंबई ते बेलापूर ः ९१

मागणीकडे दुर्लक्ष
विशेष म्हणजे, सुविधेअभावी आणि सरकारने लादलेल्या विविध करांमुळे जलवाहतुकीचे तिकीट भाडे भरमसाट होते. भाऊचा धक्का आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनसवरून हायस्पीड वॉटर टॅक्सी चालवण्यात येतात; मात्र टर्मिनसवर पोहचण्यासाठी प्रवाशांना नियमित बससेवा नसल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि प्रवासी समुद्रसफारीचा आनंद लुटण्यापासून वंचित राहत होते. हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवा गेट वे ऑफ इंडियापासून सुरू करण्याची मागणी वॉटर टॅक्सी मालकांकडून करण्यात आली; परंतु त्याला मान्यता मिळालेली नाही.

वॉटर टॅक्सीला सबसिडी द्या!
देशात गोवा, कोलकाता व कोचीनमध्ये सर्वाधिक जलवाहतूक होते; कारण तिथे सबसिडी दिली जाते. सध्या मोठ्या आकाराच्या वॉटर टॅक्सीला अजूनही प्रतिसाद मिळत नाही. वाहतुकीचा खात्रीशीर पर्याय आणि तिकीट कमी असल्यास प्रवासी वॉटर टॅक्सीतून प्रवास करील. जलवाहतुकीला सबसिडी दिल्यास तिकीटदर कमी होईल. त्यामुळे सरकारने त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

पावसाळ्यात प्रतिसाद नाही
पावसाळ्यात बेलापूर ते एलिफंटा आणि बेलापूर ते नेरूळदरम्यान वॉटर टॅक्सी सुरू होती. मात्र, हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. जुलै ते सप्टेंबरदरम्यान ११० प्रवाशांनी वॉटर टॅक्सीतून प्रवास केला. मे २०२२ पासून आतापर्यंत बेलापूर ते भाऊच्या धक्क्यापर्यंत हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवा बंद आहे.

असे आहेत तिकीट दर
- बेलापूर ते एलिफंटा ः ५०० ते ७५० रु.
- भाऊचा धक्का ते बेलापूर ः ८२५ ते १२१० रु.
- बेलापूर ते नेरूळ ः २०० ते ४०० रु.
- भाऊचा धक्का ते मांडवा ः ४५० रु.

हायस्पीड वॉटर टॅक्सीसाठी मोठ्या प्रमाणात इंधन लागते. सध्या इंधन दरवाढीमुळे वॉटर टॅक्सी परवडत नाही. त्यामुळे आता आम्ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा विचार करत आहोत; परंतु ती महाग आहे. त्यामुळे सरकारने इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीखरेदीसाठी सबसिडी द्यावी. जेणेकरून तिकीट दर कमी करता येतील आणि प्रदूषणही होणार नाही. पर्यावरणस्नेही वॉटर टॅक्सीतून प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढेल.
- सोहेल कझानी, व्यवस्थापकीय भागीदार, इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस