तुळशी विवाहासाठी बाजारपेठेत लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congestion market
तुळशी विवाहासाठी बाजारपेठेत लगबग

तुळशी विवाहासाठी बाजारपेठेत लगबग

डोंबिवली : दिवाळी संपताच सर्वत्र तुलशी विवाहाची चाहूल लागते. कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीपासून तुळशी विवाहास प्रारंभ होतो. घरोघरी व मंदिरात सार्वजनिक स्वरूपात तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. तुळशीला आयुर्वेदातही मोठे महत्त्व असल्याने घरोघरी तुळशी वृंदावने दिसतात. यावर्षी ५ नोव्हेंबरपासून या विवाह सोहळ्यांना प्रारंभ होत आहे. यासाठी लागणारे साहित्य बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून ते खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची लगबग सुरू झाली आहे.

हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. तुळशीचे रोप, ऊस, मुळा, कळस, नारळ, कापूर, आवळा, फळे, गंगाजल, पेरू, दिवा, धूप, फूल, चंदन, हळद कुंडे, विड्याची पाने, सुपाऱ्या, खोबऱ्याच्या वाट्या, हळद-कुंकू, पंचा, नैवेद्यासाठी फराळाचे साहित्य, लाह्या, बताशे, नववधूसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जसे मेहंदी, साडी, बांगड्या, टिकली आदी साहित्यांनी बाजारपेठेत दुकाने सजली आहेत.

ऊस
तुळशी विवाहासाठी ऊस हा महत्त्वाचा मानला जातो. उसाची किंमत ही गेल्या वर्षीपेक्षा पंधरा रुपयांनी वाढली आहे.

तुळशीचे रोप
तुळशी विवाहासाठी तुळशीचे रोप महत्त्वाचे आहे. या दिवशी नवीन तुळशीची पूजा करून ती आपल्या घराच्या आवारात लावली जाते. तुळशी रोपाची किंमत ही ६० ते ७० रुपये इतकी झाली आहे.

नारळ
बाजारामध्ये लहान नारळ हे १५ रुपये, मध्यम आकाराचे २० रुपये, तर मोठ्या आकाराचे नारळ ३० ते ३५ रुपयांना मिळत आहेत.

मागील दोन वर्षांच्‍या तुलनेत यंदा तुळशी विवाह पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद हा वाढलेला आहे.
- आशीष गुप्ता, विक्रेता, पूजा साहित्य भांडार

विवाह सोहळ्याचे स्‍वरूप
तुळशी विवाहानिमित्त घरोघरी चुन्याची रांगोळी काढली जाते. तुळशी रोपाची नवीन माती घालून वृंदावनाची रंगरंगोटी केली जाते. दारात झेंडूच्या, आंब्याच्या पानांचे तोरण, पताका लावल्या जातात. घरातीलच कन्या मानून तुळशीला सजवतात. मंजिरी असलेली तुळस लग्नासाठी योग्य असते, असे मानले जाते. सजवलेल्या उसांचा व केळ्यांच्या पानांचा सुरेख मंडप केला जातो. तुळशी विवाहासाठी पाटावर आसन टाकून तुळस आणि शालिग्राम मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रथम कलश आणि गौरी गणेशाची पूजा केली जाते.

काही ठिकाणी विड्याचे तसेच वर म्हणून फेट्याचेही पूजन करतात. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात. बालकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणत विवाह लावला जातो. विष्णू आणि तुळशीची आरती करून पूजेनंतर प्रसादाचे वाटप केले जाते. दिवाळी फराळ, लाह्या-बत्ताशे, खजूर, उसाचे तुकडे वाटले जातात. विवाह झाल्‍यावर फटाक्‍यांची आतषबाजी केली जाते. या पूजेत मुळा, रताळे, आवळा, मनुका, पेरू विविध फळे यांचा समावेश असतो. तुळशी विवाह संपन्न झाल्‍यावर विवाहेच्छुकांची लगीनघाई सुरू होते.