ठाण्याच्या सौदर्याला स्वच्छतेची जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्याच्या सौदर्याला स्वच्छतेची जोड
ठाण्याच्या सौदर्याला स्वच्छतेची जोड

ठाण्याच्या सौदर्याला स्वच्छतेची जोड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ३ : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतले ‘सुंदर’ ठाणे शहर साकारताना त्याला स्वच्छतेचीही जोड देण्यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी नुकताच सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील आनंदनगर ते माजिवडापर्यंत पाहणी दौरा केला. ठाण्याच्या प्रवेशद्वारावरील रस्‍त्‍यांची पातळी एकसमान करण्यापासून ते ठिकठिकाणी पसरलेला डेब्रिज, मातीचे ढीग दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नको असलेले जाहिरातीचे बोर्ड हटवा, चौकांमधील सिग्नल आणि कॅमेऱ्यांची जागा बदला अशा सूचना देत सौंदर्यीकरण करताना स्वच्छतेशी तडजोड नको, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. तसेच या सर्व निर्देशांची अंमलबजावलणी तातडीने करून १५ दिवसांत परिणाम दिसलाच पाहिजे, असेही त्‍यांनी बजावले.
आनंदनगर नाक्यापासून पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी दौरा सुरू केला. ठाण्यात प्रवेश करतानाच रस्त्याची कमी-जास्त असलेली पातळी आयुक्तांना खटकली. रस्त्याचा हा पट्टा तातडीने दुरुस्त करावा. तसेच, दिशादर्शक फलकांची पुरेशी आणि सहज दिसतील अशी मांडणी केली जावी, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले. इस्टर्न एक्स्प्रेस हायवेचे सौंदर्यीकरण रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत करताना त्यात कुठेही तडजोड नको, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रवेशद्वारापाशी उभ्या राहणाऱ्या २५ मीटर उंचीच्या दीपस्तंभाच्या कामाचाही आढावा त्यांनी घेतला.
माजिवडा नाका येथील रंग, चित्रे यांची संकल्पना लवकर ठरवून ते काम ठरलेल्या वेळेत करावे, अशा सूचना देत उपयोगात नसलेले जाहिरातींचे स्टँड, जुन्या चौक्या हटवण्याचे आदेश बांगर यांनी दिले. तसेच त्या पूर्ण परिसराला चांगले रूप कसे मिळेल, याबद्दल अधिकारी आणि कंत्राटदार यांनी विचारपूर्वक कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.

डेब्रिज हटवण्यासाठी पथक
ठिकठिकाणी डेब्रिज, मातीचे ढिगारे पडलेले आहेत. सर्व पुलांवर माती साठून त्या धुळीचा त्रास होत असल्याचेही बांगर यांच्या निदर्शनास आले. त्यावर सफाई कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून पुलांवरील माती हटवली जाईल, अशी व्यवस्था करण्यास नौपाडा आणि माजिवडा येथील उपायुक्तांना सांगितले.

उद्यानांच्या स्वच्छतेवर भर
उड्डाण पुलाखाली असलेली उद्याने, सेवा रस्त्यालगत नव्याने विकसित केलेली उद्याने दररोज स्वच्छ झाली पाहिजेत. ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी लावलेले डबे वेळच्यावेळी रिकामे झाले पाहिजेत. या सगळ्यांची जबाबदारी स्थानिक स्वच्छता निरीक्षकांवर राहील, त्यात हयगय नको, असा इशारा आयुक्त बांगर यांनी दिला.

सिग्नलमुळे चौकांच्या सौंदर्यात बाधा
तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन आणि माजिवडा जंक्शन ही वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जंक्शन आहेत. येथील चौकामध्ये लावण्यात आलेल्या सिग्नल आणि कॅमेऱ्यांच्या खांबांमुळे त्या चौकाच्या सौंदर्यास बाधा येत असल्याचे निरीक्षण आयुक्त बांगर यांनी नोंदविले. हे सिग्नल आणि कॅमेरे पुलालाच योग्य पद्धतीने लावता येतील का, हे पाहण्याच्या सूचना त्यांनी उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी यांना दिल्या.