मनोरची वाहतूककोंडी फुटणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनोरची वाहतूककोंडी फुटणार!
मनोरची वाहतूककोंडी फुटणार!

मनोरची वाहतूककोंडी फुटणार!

sakal_logo
By

बोईसर, ता. ३ (बातमीदार) : मनोर-पालघर रस्त्यावर मनोर ग्रामपंचायत हद्दीतील वाहतूककोंडी आणि बेकायदा पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालघर जिल्हा वाहतूक शाखेकडून चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या उपस्थितीमुळे मनोर गावच्या हद्दीतील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मनोर ग्रामपंचायत हद्दीत दोन कर्मचारी, महामार्गावरील चिल्हार फाटा आणि टेन नाक्यावर प्रत्येकी एक वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.
नुकताच वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी आसिफ बेग यांनी मनोर भागात भेट दिली. मनोरमधील रिक्षा युनियनचे पदाधिकारी, रिक्षाचालक आणि टेम्पोचालकांची भेट घेतली. वाहतूक नियम आणि दंडाची माहिती देत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना केल्या. येत्या काळात वाहतूक नियमनासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. रिक्षाचालकांना युनिफॉर्म घालणे बंधनकारक असल्याचे सांगत प्रवाशांसोबत वर्तणूक सुधारणा करण्याचे आवाहन केले.
ऑक्टोबर महिन्यात जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्ह्यात स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्यात आली आहे. वाहतूक शाखेत दोन अधिकारी आणि ५३ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. पालघर शहर परिसरासाठी दहा कर्मचारी, तर बोईसर औद्योगिक वसाहत आणि नागरी भागात एक अधिकारी आणि दहा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक नियमनासाठी मनोर भागात चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.