वाशीनाक्याच्या वाणी उद्यानात सापांची वस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीनाक्याच्या वाणी उद्यानात सापांची वस्ती
वाशीनाक्याच्या वाणी उद्यानात सापांची वस्ती

वाशीनाक्याच्या वाणी उद्यानात सापांची वस्ती

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ३ (बातमीदार) ः चेंबूर परिसरात पालिकेची एकूण २३ उद्याने आहेत. त्यापैकी वाणी उद्यान सध्या वारंवार होत असलेल्या सर्पदर्शनामुळे चर्चेत आहे. तसेच गर्दुल्ल्यांसाठी, प्रेमी युगुलांसाठी हे अभयारण्य ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र उद्यानाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांसाठी ते निरुपयोगी ठरत आहे. कचरा तसेच पाण्याअभावी मरणपंथाला लागलेली रोपे अशी ओळख वाशीनाका परिसरातील वाणी उद्यानाची होताना दिसत आहे.
वाणी उद्यानाच्या देखरेखीसाठी खासगी कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले आहे. तरीदेखील या उद्यानाची दुरवस्था होत आहे, ही आश्चर्याची बाब असल्‍याने नागरिकांचे म्‍हणणे आहे. या उद्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर उद्यानाच्या नावाचा फलकदेखील नाही, येथूनच उद्यानाबाबत उदासीन असलेल्या पालिकेची प्रचिती येते. या उद्यानाच्या सुरक्षेची जबाबदारी एका सुरक्षा रक्षकावर सोपवण्यात आली आहे. बंद पथदिवे व दयनीय अवस्थेत असलेली दोन्ही प्रवेशद्वार यामुळे त्यांना त्यांचे काम करण्यात अडचणी येत आहेत. रात्री-अपरात्री नशेखोर तरुण, तरुणी या उद्यानात घुसतात व नशापान करतात; परंतु त्यांना रोखण्यास ते असमर्थ आहेत.
दरम्‍यान, उद्यानात होणारे सर्पदर्शन यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. मुलांना उद्यानात खेळायला पाठवायचे की नाही, या द्विधा मनःस्थितीत ते आहेत. नागरिकांच्या पैशांचा अपव्यय टाळून या सर्व समस्यांवर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रवेशद्वाराच्या डागडुजीसाठी साहित्य मागवले आहे
वाणी उद्यानाविषयी एम पश्चिम प्रभागाचे उद्यान विभागाचे अधिकारी अमोल इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांना माध्यमांशी बोलता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. संबंधित कंत्राटदाराने आजच या मैदानातील डेब्रिज आम्ही उचलले आहे, असे सांगत त्याच्याकडे फक्त सुरक्षारक्षक व स्वच्छतेची जबाबदारी असल्याचे सांगत प्रवेशद्वाराच्या डागडुजीसाठी साहित्य मागवले आहे. झाडांना पाणी घालण्याचे कंत्राट दुसऱ्या संस्थेकडे असल्याचे त्यांनी संगितले.