उल्हासनगरात मनसेचे धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात मनसेचे धरणे आंदोलन
उल्हासनगरात मनसेचे धरणे आंदोलन

उल्हासनगरात मनसेचे धरणे आंदोलन

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : नागरी सुविधांच्या समस्यांचा बोजवारा उडाल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे वारंवार निदर्शनास आणून दिल्यावरही पालिका दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला. या पवित्र्याने पालिकेची यंत्रणा हलली असून सुविधांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी मनसेला दिले आहे.
शहाड स्टेशन परिसर, गुलशन नगर, बस स्थानक परिसर, सेंच्युरी नाका ते खेमानी मच्छी मार्केट रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. भोसले हॉस्पिटल ते बिर्ला मंदिर रस्त्यावर दररोज दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. शाळा नंबर २३, २६ ची दुरुस्ती, शाळेजवळील एमएमआरडीएच्या शौचालयाची दुरुस्ती, जुन्या-जीर्ण झालेल्या जलवाहिन्या फुटून पाणी रस्त्यावर वाहत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तानाजीनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने परिसरातील नागरिक हैराण आहेत. नागरी सुविधांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.
मात्र पालिकेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त झालेले मैनुद्दीन शेख यांनी तानाजी नगर एमआयडीसी रोडवर धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला विशेषतः महिला वर्गाने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तरुण सेवकानी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी परमेश्वर बुडगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्याने मैनुद्दीन यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस राजन शितोळे, संयुक्त सरचिटणीस सागर चाळसे, मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, जिल्हा सचिव संजय घुगे, उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख, विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष वैभव कुलकर्णी, कल्पेश माने, वाहतूक सेनेचे काळू थोरात, राहुल वाकेकर, महेश साबळे, विभाग अध्यक्ष कैलास वाघ, प्रमोद पालकर आदी उपस्थित होते.