ताड गोळे बाजारात विक्रीसाठी दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ताड गोळे बाजारात विक्रीसाठी दाखल
ताड गोळे बाजारात विक्रीसाठी दाखल

ताड गोळे बाजारात विक्रीसाठी दाखल

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ८ (बातमीदार) : नीरा या पेयासाठी आणि ताडगोळा फळांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष ताड. परतीचा पाऊस हा राज्यातून निघून गेला असून गेल्या आठवड्यापासून तीव्र उन्‍हाळा सुरू झाला आहे. भरदुपारी पडणाऱ्या उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली वाढू लागली आहे. ही काहिली भरून काढण्यासाठी बाजारामध्ये ताडगोळे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. नैसर्गिक पाण्याने भरलेले हे फळ चवीला गोड असून या फळामुळे शरीराला थंडावा मिळतो.
ताडगोळ्याचा हंगाम यंदा उशिराने सुरू झाला असून परतीच्या पावसाचा फटका हा ताडगोळ्याच्या उत्पादनालासुद्धा बसला आहे. त्यामुळे ताडगोळ्याची किंमतसुद्धा वाढली आहे. ताडगोळ्याचा दर प्रतिनग हा १२ रुपये असून १२० ते १३० रुपये डझन ताडगोळे विकले जात आहेत. ठाणे जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात मिळणाऱ्या ताडाच्या झाडाच्या ताडगोळ्यांना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लिचीप्रमाणे पारदर्शक असलेला हा पदार्थ शरीरासाठी अत्यंत गुणकारी आणि चवदार असल्याने ताडगोळ्यांना मोठी मागणी आहे.
-----------------------
आरोग्यासाठी गुणकारक
ताडगोळे चवदार आणि शरीरासाठी अत्यंत गुणकारी असे समजले जातात. निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यात मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्व आणि पाणी असून ताडगोळ्यांच्या सेवनामुळे इम्युनिटी सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते. ताडगोळ्यांमध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात. त्यामुळे एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे आरोग्यासाठी गुणकारक असल्याने या ताडगोळ्यांना आता मागणी वाढू लागली आहे.
--------------------------
नीरा पेयाची किंमतसुद्धा वीस रुपये ग्लास इतकी झाली आहे. आधी १५ रुपये ग्लास होती, असे नीरा विक्रेत्यांनी सांगितले.
-------------------------
कोट
ताडगोळ्यांच्या किमती वाढलेल्या असूनही ताडगोळ्यांची मागणी ही मोठ्या प्रमाणात होत आहे.
- सुभाष आवटे, विक्रेता