Mumbai : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या नासाडीवर निर्बंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai
पाण्याच्या नासाडीवर निर्बंध

Mumbai : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या नासाडीवर निर्बंध

नवी मुंबई : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने पाण्याच्या अमर्याद वापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार घरगुती वापरासाठी दिलेल्या पाण्याचा वापर वाहन धुण्यासाठी, झाडांसाठी तसेच बांधकामासाठी केल्यास महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे.

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे महापालिकेचे मोरबे धरण यंदाही पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. अशातच शहरात वाढलेली लोकसंख्या पाहता धरणातील शिल्लक पाणी पुरेल की नाही, याबाबत साशंकता असल्याने पालिकेने आत्तापासूनच उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. हिवाळा संपताच पाणीटंचाई उद्भवत असल्याने महापालिकेतर्फे पाणीवापरावर निर्बंध आणण्यास सुरुवात केली आहे. गावठाणांमधील वाढलेली घरांमध्ये वाढ झाली आहे. एका घराच्या जागेवर आता तीन आणि चार मजली इमारतींनी घेतली आहे.

वित्तीय तूट भरून काढण्याचे आव्हान
नवी मुंबई महापालिकेला पाणी वितरणासाठी वर्षाला १२७ कोटी रुपयांचा खर्च येतो. त्याबदल्यात पालिकेला पाणीपट्टीतून अवघे ८२ कोटी रुपये उत्पन्न मिळते. उर्वरित ४२ कोटींचा तोटा दर वर्षी सहन करावा लागत आहे. अशातच गावठाणांमध्ये एका घराच्या जागेवर आता तीन आणि चार मजली इमारती उभ्या राहत आहेत. सिडको वसाहतींमध्येही एलआयजीसारख्या बैठ्या चाळींच्या जागेवर दोन आणि तीन मजली इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे एका नळजोडणीवर २० आणि २५ खोल्यांना पाणी पुरवले जात आहे; पण देयक मात्र एकच दिले जात असल्याने पालिकेच्या महसुलावरही परिणाम होत आहे.

कारवाईसाठी तीन पथकांची नेमणूक
पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने विभाग कार्यालयातर्फे तीन पथके नेमली आहेत. या पथकामार्फत रहिवासी सोसायट्यांवर बारीक नजर ठेवली जाणार आहे. एका कुटुबांमागे दिलेल्या पाण्यापेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्या सोसायट्यांना नोटीस बजावून कारवाई केली जाणार आहे. दोन वेळा नोटीस देऊन न सुधारल्यास तिसऱ्या वेळेपासून वाणिज्य दर आकारले जाणार आहेत.

- २०११ नंतरच्या झोपड्यांनाच सार्वजनिक नळजोडणी.
- टर्शरी ट्रीटमेंटद्वारे प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा.
- वाशीत पुनर्बांधणीच्या प्रकल्पांना ३०० रुपये प्रतिटँकर (दहा हजार लिटर) दराने पाणीपुरवठा.
- बगिच्यांसाठी ६० रुपयांना एक टँकर.

एका घराच्या जागेवर जेवढ्या खोल्या असतील, तेवढ्यांची देयके एकाच मालकाला दिली जाणार आहेत. घरगुती वापरासाठी दिलेले पाणी मर्यादेपेक्षा अधिक वापरल्यास अतिरिक्त पाण्यावर वाणिज्य दराने देयके आकारण्यात येणार आहेत. तशा नोटिसा बजावण्याचे काम अभियांत्रिकी विभागाने सुरू केले आहे.
- संजय देसाई, शहर अभियंते, नवी मुंबई महापालिका