माथेरान रोडलगतची अतिक्रमणे रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माथेरान रोडलगतची अतिक्रमणे रडारवर
माथेरान रोडलगतची अतिक्रमणे रडारवर

माथेरान रोडलगतची अतिक्रमणे रडारवर

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ३ (वार्ताहर)ः पनवेल-माथेरान रोडवरील सुकापूर भागात रस्त्यालगत शेकडो अतिक्रमणे झालेली आहेत. या अतिक्रमणांमुळे वर्दळीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा निर्धार केला असून १५० हून अधिक जणांना नोटिसा पाठवल्या आहेत.
पनवेलच्या शहरी भागांबरोबर ग्रामीण भागाचाही विकास झपाट्याने होत आहे. या ठिकाणी जमिनीचे भाव गगनाला भिडले असतानाच शासकीय जागा नागरिकांकडून बळकावल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्यालगत अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे चित्र आहे. सुकापूर, आकुर्ली, चिपळे, नेरे आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या लोकवस्तीमुळे महत्त्वाच्या रस्त्यालगत अतिक्रमण झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. सुकापूर ते नेरे रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी साईड पट्टीच उरली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे. नेरे गावापासूनचा परिसर नैनाक्षेत्रात येत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवरील या अतिक्रमणांमुळे या मार्गे माथेरानकडे जाणारी वाहतूक प्रभावित होत आहे. त्यामुळे या मार्गावरील १५० हून अधिक बेकायदा बांधकामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा बजावून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
-----------------------------------------------
अतिक्रमणांवरील दुर्लक्षाचा फटका
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्यालगत असलेल्या जागांवर अनेक हातगाड्या, लाद्यांच्या दुकानापासून फर्निचर, बेकायदा घरे, पक्की बांधकामे, गाड्या धुण्याचे सेंटर, ऑटो पार्टस, दुचाकी चारचाकी गॅरेज, चिकन सेंटर, चायनीज गाडे, चपलांची दुकाने, भाजी मंडई इत्यादी उभारले गेले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याचे या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
--------------------------------
अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना अतिक्रमण काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. तसेच अतिक्रमणे काढली गेली नाही तर लवकरच पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे.
- मिलिंद कदम, उप-विभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल