आनंदाच्या शिधातून तेलच गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदाच्या शिधातून तेलच गायब
आनंदाच्या शिधातून तेलच गायब

आनंदाच्या शिधातून तेलच गायब

sakal_logo
By

कामोठे, ता. ३ (बातमीदार) : नवीन पनवेलमध्ये १९ क्रमांकाच्या रेशनिंग दुकानावर नागरिकांना आनंदाचा शिधाचा मिळालाच नाही. ज्यांना आता शिधा मिळत आहे, त्यातून चक्क तेलच गायब झाल्याचा प्रकार नवीन पनवेलमध्ये घडला आहे. या दुकानदाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी दुकानदाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
दिवाळी फराळासाठी प्रत्येकी एक किलो रवा, पाम तेल, साखर, डाळ फक्त १०० रुपयांत देण्याची ''आनंदाचा शिधा'' ही योजना राज्य सरकारने जाहीर केली. मात्र, दिवाळी संपली तरी पनवेलमधील अनेक रेशनिंग दुकानावर या शिधाचे वाटप झालेच नाही. नवीन पनवेलमधील १९ क्रमांकाच्या दुकानावर बुधवारी (ता. २) सेक्टर ६, ७ मधील महिलांनी शिधासाठी गर्दी केली होती. या वेळी दुकानदार महिलेने पूर्ण पैसे घेतले; मात्र पाम तेल वगळून चणाडाळ, रवा, साखर महिलांच्या हातावर ठेवले. याबाबत महिलांनी विचारणा केली असता, तेल संपले आहे, असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले.
भाजप नवीन पनवेल प्रभाग १६ अध्यक्ष शिवाजी भगत यांनी दुकानदारातील तेल कुठे गायब झाले, असा सवाल उपस्थित करून दुकानदाराच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर तेथील वातावरण बराच वेळ तापलेले होते. भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे तक्रार केली असून, दुकानदार महिलेच्या कारभाराची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

आनंदाचा शिधाचे काटेकोरपणे वाटप झाले पाहिजे. कुणी दुकानदार शिधा वाटपात गैरप्रकार करत असल्यास नागरिकांनी पुरवठा विभागाला तक्रार करावी. नवीन पनवेल १९ क्रमांकाच्या दुकानदाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश पनवेल पुरवठा विभागाला दिले आहेत.
- मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी

कोरोनाकाळात व्यवस्थित धान्य वाटप केले नाही. दिवाळीचा आनंदाचा शिधाही पूर्ण मिळालेला नाही. दुकानदाराची सखोल चौकशी केली पाहिजे. अन्यथा, महिला तहसील कार्यालयावर आंदोलन करणार आहेत. आनंदी शिधासाठी १०० रुपये दिले, तरी तेल नाही, पावती दिली नाही. दरमहा पूर्ण धान्य मिळत नाही. दुकानदार महिला नेहमी अरेरावीच्या भाषेत बोलत असते.
- कमल भगत, सेक्टर ७

रेशनिंग दुकानावर वेळेवर धान्य मिळत नाही. दिवाळीचा आनंदाचा शिधा उशिरा मिळाला असून, तेल गायब आहे. शिधा वाटपात गैरप्रकार करणाऱ्या दुकानदारांवर पनवेल तहसीलदारांनी कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे.
- स्वप्नाली पांढरे, सेक्टर ७

अन्न धान्य पुरवठा विभागाने आनंदाचा शिधा पूर्ण दिला आहे. दुकानात मदतनीस नाही, त्यामुळे तेल देता आले नाही. ते देणार आहे.
- रूपा सावंत, दुकानदार