आश्वासनावर आंदोलकांची बोळवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आश्वासनावर आंदोलकांची बोळवण
आश्वासनावर आंदोलकांची बोळवण

आश्वासनावर आंदोलकांची बोळवण

sakal_logo
By

पनवेल, ता. ३ (बातमीदार) : बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या पनवेल एसटी आगाराला होत असलेल्या विलंबाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाली होती. याच अनुषंगाने गुरुवारी एकदिवसीय उपोषण करण्यात आले; मात्र एसटीच्या कार्यकारी अभियंत्यांनी ८ दिवसांत या विषयावर बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
पनवेल एसटी आगाराचे काम १ नोव्हेंबरपर्यंत सुरू झाले नाही, तर उपोषण करण्याचा पनवेल प्रवासी संघाने इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० वाजता पनवेल आगारात उपोषण करण्यात आले. या वेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भक्तिकुमार दवे यांनी २००८ मध्ये स्थानक पडल्यापासून एसटी महामंडळाकडे केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती देऊन ऑनलाईन भूमिपूजन करून पनवेलकरांच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप एसटी महामंडळावर केला. या वेळी सर्व आंदोलकांनी पनवेल आगाराच्या कामातील दिरंगाईचा निषेध केला. त्यामुळे मुंबई विभागाचे कार्यकारी अभियंता विजय रेडेकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन कामाला उशीर होण्यामागील कारणांची माहिती देण्याचा प्रयत्न करत ८ दिवसांत पत्र देऊन बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.
-------------------------
नागरिकांचा उल्लेखनीय सहभाग
या आंदोलनात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, कार्यवाह श्रीकांत बापट, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल अध्यक्ष अभिजीत पाटील, शेकापचे आमदार बाळाराम पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार भोईर, बबनदादा पाटील, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, माजी नगरसेविका लिना गरड, कांतिलाल कडू सहभागी झाले होते. तसेच नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.
----------------------------
आंदोलनात सहभागी पनवेलकर मंडळी आगाराचे काम पूर्ण होईपर्यंत कटिबद्ध राहणार आहेत. पनवेल आगाराचा प्रश्न हा लालफितीत अडकलेला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- डॉ. भक्तिकुमार दवे, अध्यक्ष, प्रवासी संघटना
---------------------------------
पनवेल आणि पनवेल परिसरातील राजकीय पक्ष व सेवाभावी संस्थांनी या व्यासपीठावर एकत्र येऊन पनवेल आगार झाले पाहिजे, यासाठी हे आंदोलन केले. आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे दोन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर पुन्हा आंदोलन करू.
- अभिजीत पाटील, सदस्य, प्रवासी संघटना