महापालिकेतील रस्ते विभाग नकोसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेतील रस्ते विभाग नकोसा
महापालिकेतील रस्ते विभाग नकोसा

महापालिकेतील रस्ते विभाग नकोसा

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकर नागरिक जेरीस आले आहेत; पण रस्त्यांच्या दुरवस्थेचा परिणाम हा नागरिकांसोबतच महापालिकेतील अधिकाऱ्यांवरही होत आहे. मुंबई महापालिकेतील रस्ते विभागात कामच नको, असे सांगत पालिकेतील जवळपास ५० अभियंत्यांनी बदल्यांचा पर्याय स्वीकारला आहे. कामाच्या व्यापामुळे अनेक अभियंते हे तणावाखाली काम करत असल्याने अनेक अभियंत्यांनी विभागातून बदली करून घेतली आहे.
महापालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी काही दिवसांपूर्वी वाहतूक विभागात काम करायचे नाही, अशा अभियंत्यांना बदलीसाठी अर्ज करण्याचे पत्र विभागांतर्गत दिले होते. या पत्राच्या आधारे महापालिकेतील अनेक विभागातील अभियंत्यांनी बदल्यांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ५० जणांना पालिकेने वेगळ्या विभागात बदली दिली आहे. अनेक अभियंत्यांनी पालिकेच्या रस्ते विभागात वरिष्ठांच्या दबावामुळेच या कामाला कंटाळून बदली घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रस्त्याच्या कामासाठी पालिकेच्या अभियंत्यांवर सातत्याने दबाव आहे. त्यामध्ये निविदा प्रक्रियेपासून ते रस्त्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यांची मोठी ऊर्जा खर्ची होत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून पालिकेचे अभियंते कामाच्या तणावामध्ये सातत्याने हैराण आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांवर मुंबईतील खड्ड्यांसोबतच रस्त्याबाबतच्या अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर येणाऱ्या तक्रारी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांसारख्या अनेक तक्रारींचा निपटारा करण्यासोबतच कार्यालयीन कामातही अनेक तास घालवावे लागत असल्याचे निदर्शनास आले होते. अनेक अभियंते हे दिवसातील १५ हून अधिक तास काम करत असल्याचीही माहिती देण्यात आली. तसेच कामाच्या ताणामुळे एका अभियंत्याला हृदयविकाराच्या झटक्याने जीवालाही मुकावे लागले. म्हणूनच अनेकांनी बदल्यांचा सोपा पर्याय अवलंबल्याचे अभियंत्यांचे म्हणणे आहे.
----
४०० किमीच्या रस्त्यांचे काम
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील ४०० किमीच्या रस्त्यांच्या कामाची सुरुवात करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश पालिकेला दिले होते. या कामासाठी कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक काम करण्याचे अपेक्षित असल्याचे महापालिकेने अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या कामाचा ताण येत आहे, अशा अभियंत्यांची उपमुख्य अभियंत्यांनी यादी तयारी करण्याचाही उल्लेख त्यामध्ये करण्यात आला. तसेच टप्प्यानुसार या अभियंत्यांची बदली इतर विभागात करण्याचीही तयारी करण्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.