अंधेरी पोटनिवडणुकीकडे सपशेल पाठ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरी पोटनिवडणुकीकडे सपशेल पाठ!
अंधेरी पोटनिवडणुकीकडे सपशेल पाठ!

अंधेरी पोटनिवडणुकीकडे सपशेल पाठ!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : बहुचर्चित अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदानासाठी प्रशासनाने सुटी जाहीर करूनही मतदारांनी सपशेल पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी सायंकाळी सहापर्यंत अवघ्या ३१.७४ टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांच्यासह एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे ६ नोव्हेंबरला लागणाऱ्या निकालाची उत्सुकता असणार आहे.

अंधेरी पूर्वसाठी एकूण २५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आज सकाळी ७ पासून धिम्या गतीने मतदानाला सुरुवात झाली होती. सकाळी अकरापर्यंत ९.७२ टक्के मतदान झाले. दुपारपर्यंतही या आकड्यात विशेष भर पडली नाही. अवघे १६.८९ टक्के मतदान दुपारपर्यंत झाले. दुपारनंतर तरी मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा असताना ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के; ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के; तर सायंकाळी सहापर्यंत एकूण ३१.७४ टक्के मतदानाची नोंद झाली.

प्रशासनाने मतदानासाठी सुटी जाहीर केल्याने मोठ्या प्रमाणात मतदान होईल, अशी अपेक्षा केली जात होती; परंतु भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी ठरली आहे. अनेक मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर दिसून आला. दुसरीकडे मतदानाच्या निमित्ताने ‘नोटा’चा पर्याय वापरण्यात येणार असल्याची तक्रारही शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याकडून करण्यात आली होती; परंतु नोटाचाही फारसा परिणाम टक्केवारीवर दिसून आला नाही. ६ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.