लालपरीला वाचवण्याचे मुख्यमंत्र्यांपुढे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लालपरीला वाचवण्याचे मुख्यमंत्र्यांपुढे आव्हान
लालपरीला वाचवण्याचे मुख्यमंत्र्यांपुढे आव्हान

लालपरीला वाचवण्याचे मुख्यमंत्र्यांपुढे आव्हान

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ ः कोरोना आणि ऐतिहासिक संपामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या उत्पन्नामुळे थोडीफार कमाई झाली असली, तरी तब्बल १० हजार ४०७ कोटींपेक्षा अधिक संचित तोटा एसटीला सहन करावा लागत आहे. बसगाड्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची उद्या (ता. ४) मंत्रालयात बैठक होत आहे. एसटीला वाचवण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांपुढे असणार आहे.
राज्यातील अनेक आगारांमध्ये डिझेल खरेदीसाठीही उत्पन्न होत नसल्याने बसगाड्या उभ्या ठेवण्याची वेळ एसटी प्रशासनावर येत आहे. कोरोनापूर्वी धावणाऱ्या १८ हजार बसगाड्यांपैकी सध्या केवळ १३ हजार बसगाड्या रस्त्यांवर धावत आहेत. परिणामी राज्यातील सेवेसह एसटीचा तोटाही वाढला आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये सुमारे ३३०७.९४ कोटींचा निव्वळ तोटा झाला, तर १०४०७.११ कोटींचा संचित तोटा झाला आहे. या तुलनेत उत्पन्न घटले असून खर्च मात्र १०,१९८.३१ कोटींवर पोहचला आहे.
-----------------
एसटीच्या ८८५ आस्थापना रिक्त
प्रवासी सुखसोयी व सुविधेसाठी राज्यभरात एकूण ३७०२ इतक्या वाणिज्य आस्थापना आहेत. त्यापैकी ८८५ आस्थापना रिक्त असल्याने एसटीचा आर्थिक स्रोत घटला आहे. यामध्ये उपाहारगृह १५०, स्नॅकबार १३६, ऊस रसवंतीगृह ३११, टी-स्टॉल ५४२, इतर १६७८ आस्थापनांचा समावेश आहे.
----------
अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळणार?
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या बैठकीत नव्या बसगाड्या खरेदी संदर्भात धोरण ठरवले जाणार आहे. बस स्थानक विकसित करण्याबाबतच्या ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ धोरणात फेरबदल केले जाणार आहे. त्यासाठी ३३ वर्षांची लीज ६० वर्षे केली जाणार आहे. नव्याने ईटीआय मशीन आणल्या जाणार असल्याने त्यांची कार्योत्तर मंजुरीही घेतली जाणार असून अनेक आर्थिक विषयांवरील निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.