ठाणे स्थानकातील गर्दी विभागली जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे स्थानकातील गर्दी विभागली जाणार
ठाणे स्थानकातील गर्दी विभागली जाणार

ठाणे स्थानकातील गर्दी विभागली जाणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी फलाट क्रमांक पाच आणि सहावरील १८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे आता फलाट क्रमांक सात आणि आठवर देण्यात आले. तसेच येत्या काही दिवसांत आणखी दहा मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे देण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे स्थानकावरील गर्दी विभागली जाणार असून जलद लोकलचासुद्धा खोळंबा थांबणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रजनीश गोयल यांनी नुकतीच ठाणे स्थानकाची पाहणी केली. यावेळी होणाऱ्या प्रचंड गर्दीचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि फलाटावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गोयल यांनी सांगितले की, ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच व सहावरून दररोज अप-डाऊन दिशेने ३१० मेल-एक्स्प्रेस जातात. बहुतांश गाड्या याच फलाटावर थांबतात. त्यामुळे ठाणे स्थानकांवर लांब पल्ल्याच्या प्रवासी आणि उपनगरीय लोकल प्रवाशांची गर्दी होते. ही गर्दी विभागण्यासाठी आता ३१० मेल-एक्स्प्रेसपैकी १८ रेल्वे गाड्या ठाणे स्थानकांच्या फलाट क्रमांक सात ते आठवर थांबवण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे स्थानकाच्या फलाट पाच ते आठवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

फलाटावरील स्टॉल हटवणार
ठाणे फलाट क्रमांक पाच-सहा, कल्याण फलाट क्रमांक तीन-चार आणि दादर स्थानकातील चार या फलाटावरील स्टॉल हटवण्यात येणार आहेत. स्टॉलधारकांना पर्यायी जागा सुचवण्याच्या सूचना रेल्वेने केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे स्थानकातील एका फलाटावर हा उपाय राबवण्यात येणार आहे.

कल्याण स्थानकावरील कार्यालय हटवणार
कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक तीन आणि चारवरील रेल्वे कटिंग आणि रेल्वे कार्यालय हटवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानकावर मोकळी जागा उपलब्ध होईल आणि प्रवाशांना कमी त्रास होईल, अशी माहिती गोयल यांनी दिली.

युटीएस ॲपचा विस्तार
युटीएस ॲपला मर्यादा असल्यामुळे मोबाईल तिकीट विक्री मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे ॲपचा विस्तार करण्यासाठी मध्य रेल्वेकडून रेल्वे बोर्ड आणि ‘क्रिस’ला प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहितीही गोयल यांनी दिली.