मेट्रो १२ प्रकल्पाला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो १२ प्रकल्पाला गती
मेट्रो १२ प्रकल्पाला गती

मेट्रो १२ प्रकल्पाला गती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ४ : कल्याण ग्रामीण भागास थेट मुंबई, नवी मुंबई, तळोजाला जोडण्यासाठी कल्याण-तळोजा मेट्रो १२ हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या कामास गती प्राप्त होत असून गेल्या महिन्याभरापासून एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या १५ दिवसांत ते पूर्ण होईल. त्यानंतर पुढील कामांना लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारित भाग असलेल्या कल्याण-डोंबिवली-तळोजा (मेट्रो १२) या मार्गाकडे महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिले जाते. या मेट्रो मार्गामुळे मुंबई, उपनगरातून ठाण्यात येणारा आणि ठाणे शहरातील प्रवासी भिवंडी, कल्याण आणि थेट तळोजा, तसेच नवी मुंबईला जोडला जाणार आहे. यासोबतच कल्याण, अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागातील प्रवासी थेट ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईला जाऊ शकणार आहेत. त्यामुळे मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते कल्याण, तसेच थेट नवी मुंबई असा सलग प्रवास विनासायास करता येणार आहे.

मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत या प्रकल्पाला गती देण्याची चर्चा झाली. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना केल्या होत्या. या प्रकल्पासाठी सामान्य सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर गेल्याच महिन्यात या मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली. आजपर्यंत या सर्वेक्षणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या प्रकल्पाला गती मिळाल्याने कल्याण-तळोजा ही महत्त्वाकांक्षी मेट्रो लवकरच प्रत्यक्षात उतरणार असल्याची आशा खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.

कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग
कल्याण-तळोजा ही मेट्रो ठाणे-भिवंडी-कल्याण या मार्गिकेला जोडली जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते तळोजा हे कल्याणमार्गे अंतर सहजरित्या कापता येणार आहे. हा मार्ग एकूण २०.७५ किमी लांबीचा असून यात १७ मेट्रो स्थानके असणार आहेत. कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हा मार्ग सुरू होणार आहे; तर पुढे डोंबिवलीतील विविध गावे आणि मानपाडा मार्गे कल्याणच्या ग्रामीण भागातून हा मेट्रो मार्ग जाणार आहे. या मार्गामुळे शहरी भागासह ग्रामीण भागही मेट्रोला जोडला जाणार आहे.