विकासाचा समतोल साधणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासाचा समतोल साधणार
विकासाचा समतोल साधणार

विकासाचा समतोल साधणार

sakal_logo
By

पालघर, ता. ४ (बातमीदार) : राज्यातील किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. पर्यावरण व स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. यावेळी ते बोलत होते.

देशाच्या आर्थिक राजधानीपासून जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये उद्योग, विविध प्रकल्प यावेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. पालघर जिल्ह्यापासून मुंबई आणखी जवळ यावी, म्हणून सातपाटी मुरबे या खाडीवर पूल उभारला जाणार आहे. जिल्ह्याची नूतन प्रशासकीय इमारत देशामध्ये सुसज्ज इमारत मानली जाते. या इमारतीमध्ये येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे. औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. येत्या काळात अनेक सुविधा या जिल्ह्याला उपलब्ध होणार आहेत. आदिवासी बांधवांच्या हाताला काम देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी आदिवासी विभागात उद्योग उभारण्याचाही विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण (दूरदृष्य प्रणालीद्वारे), खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग (दूरदृष्य प्रणालीद्वारे), राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त दिनकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.