गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून बंद
गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून बंद

गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून बंद

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुनर्बांधणीसाठी ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी या संदर्भात आदेश जारी केला आहे. हा पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिम दरम्यानच्या प्रमुख आणि उपनगरातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. पूल बंद झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग दिलेले आहेत.
मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्याची सूचना केली होती. पुनर्बांधणीसाठी हा पूल किमान दोन वर्ष सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पुलाचा एक भाग २०१८ मध्ये कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. हा पूल धोकादायक झाल्याने मुंबई वाहतूक पोलिस सहआयुक्त आणि महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ३ नोव्हेंबरला बैठक झाली होती. त्याप्रमाणे आज (ता. ४) वाहतूक पोलिसांनी पूल वाहतुकीसाठी बंद करत असल्याचे आदेश जारी केले आहेत.
----
पर्यायी मार्ग
- खार सबवे, खार, मुंबई
- मिलन सबवे उड्डाण पूल, वाकोला, सांताक्रूझ, मुंबई
- कॅप्टन गोरे उड्डाण पूल (पार्ले ब्रिज), विलेपार्ले, मुंबई
- अंधेरी सबवे, अंधेरी, मुंबई.
- बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल, जोगेश्वरी, मुंबई
- मृणालताई गोरे उड्डाण पूल, गोरेगाव, मुंबई