मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीला खिळ बसणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीला खिळ बसणार
मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीला खिळ बसणार

मराठी पाट्यांच्या अंमलबजावणीला खिळ बसणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर पालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला असतानाच या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगित मिळाली आहे. त्यामुळे पालिकेच्या कारवाईला खिळ बसणार आहे. मुंबईत पालिकेच्या टीमने केलेल्या सर्वेक्षणानुसार पाच हजार दुकानांनी पाट्या लावल्या; मात्र त्या नियमानुसार लावल्‍या नसल्याने त्यांना कारवाईच्या नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.
मुंबईत सुमारे साडेपाच लाख दुकाने आहेत. पालिकेने आतापर्यंत २७ लाख दुकानांची तपासणी केली. यात सुमारे २२ हजार दुकानांनी मराठी पाट्यांची अंमलबजावणी केल्याचे आढळले; तर पाच हजार दुकानांनी मराठी पाट्या लावल्या, पण त्या नियमानुसार लावल्या नाहीत. म्हणजे अर्धी अक्षरे मराठी, हिंदी व इंग्रजीत असलेले फलक लावण्यात आले. नियमानुसार ठळकपणे मराठीत पाट्या असणे बंधनकारक असल्याने अशा दुकानांवर पालिकेने कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत; मात्र व्यापारी संघटना याविरोधात न्यायालयात गेल्याने न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पालिकेची ही कारवाई थांबली असल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करूनच याबाबतची पुढची रणनीती ठरवण्यात येईल, असेही कबरे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील पुढील सुनावणी ही १८ डिसेंबरला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वर्कर्स असोसिएशनला मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे ही स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत या मराठी पाट्यांच्या प्रकरणात पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणतीही कारवाई करता येणार नाही. येत्या १८ डिसेंबरपर्यंत मराठी पाट्यांसाठी दुकानदार किंवा आस्थापनांवर कारवाई करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा हा मोठा दिलासा असल्याची प्रतिक्रिया फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वर्कर्स असोसिशएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी दिली.