वीट व्यावसायिक अडचणीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीट व्यावसायिक अडचणीत
वीट व्यावसायिक अडचणीत

वीट व्यावसायिक अडचणीत

sakal_logo
By

महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. ५ : डहाणू तालुक्यात परतीच्या पावसाने भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून उशिरापर्यंत पाऊस पडत राहिल्याने अजून जमिनीत ओलावा आहे. याचा फटका तालुक्यातील इतर व्यवसायाबरोबरच वीट व्यावसायिकांना देखील बसला आहे. साधारण दसरा झाल्यानंतर वीट व्यावसायिक हा व्यवसाय करण्यास सुरुवात करतात. यंदा मात्र पावसामुळे अद्याप जमिनीत ओलावा तर काही भागात पाणी असल्याने हा व्यवसायच अजून सुरू करता आलेला नाही. त्यामुळे वीट व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भातशेती हा मुख्य व्यवसाय काही वर्षांपासून तोट्यात चाललेला आहे. या व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून काही शेतकरी आणि बेरोजगार तरुण वीट व्यवसाय करतात; मात्र यंदा उशिरापर्यंत परतीचा पाऊस पडल्याने जमिनीत अद्यापही ओलावा आहे. यामुळे वीट उत्पादन सुरू करता येत नाही. अनेक वीट उत्पादक हे एप्रिल, मे महिन्यानंतर मजुरांना आगाऊ रक्कम देऊन वीट तयार करण्यासाठी मजूर नियुक्त करून ठेवतात. ग्रामीण भागात याला ‘पातले’ असे संबोधतात. यात नवरा-बायको, त्यांची मुले यांना अन्न-धान्य पुरविणे यासाठी अगोदर खर्च करावा लागतो. तसेच मातीच्या विटासाठी तूस, कोळसा, लाल माती, पाण्याची व्यवस्था आदी बाबींसाठी गुंतवणूक करावी लागते. मात्र पावसामुळे अद्याप वीट उत्पादन सुरू न केल्याने व्यावसायिकांना पुन्हा पुन्हा मजुरांना पैसे द्यावे लागत आहेत. दसरा, दिवाळीला व्यवसाय सुरू केल्यानंतर आतापर्यंत व्यावसायिकांच्या हातात पैसे येण्यास सुरुवात होते, पण अजूनही उत्पादन सुरू न झाल्याने व्यावसायिकांची अडचण वाढली असून यंदाच्या वर्षी उशीर झाल्याने वीट उत्पादन घटणार आहे.
....
विटांना मुंबई, ठाण्यातून मागणी
पालघर जिल्हातील डहाणू व पालघर तालुक्यात कासा, तलवाडा, आगवन, धामटने, पेठ, महालक्ष्मी, वरोती, वाघाडी, सायवन या दुर्गम भागात वीट उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. हा व्यवसाय करणारे साधारण एक ते दीड हजार वीट व्यावसायिक असून दरवर्षी हजारो कुटुंबे या व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. येथील विटांना वसई, मुंबई, ठाणे, पनवेल या शहरातून, तसेच ग्रामीण भागातही औद्योगिकीकरणामुळे चांगली मागणी आहे.
....
सध्या सिमेंटच्या विटा बनविण्याचे काम सुरू झाल्याने, तसेच या विटा बनविण्याची यंत्रे उपलब्ध आहेत. मातीच्या विटांपेक्षा सिमेंटच्या विटा स्वस्त असल्याने त्यांना मागणी जास्त आहे. तसेच मातीच्या विटा बनविण्यास मेहनत व खर्चसुद्धा जास्त होत असल्याने वीट व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
- संतोष देशमुख, वीट व्यावसायिक, महालक्ष्मी
.....
आम्ही विटा तयार करण्याचे काम करून आपले पोट भरतो. यावर्षी अजून नीट वीट व्यवसायाला सुरुवात झालेली नाही. पैसे आगाऊ घेतलेले असल्याने दुसरीकडे कुठे कामाला जाऊ शकत नाही. त्यामुळे लवकर या कामाला सुरुवात झाली तर पोटापाण्याचा प्रश्न सुटेल.
- सुरेश लीलका, वीट कामगार