अखेर माणगाव बसस्थानक सुसज्ज होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर माणगाव बसस्थानक सुसज्ज होणार
अखेर माणगाव बसस्थानक सुसज्ज होणार

अखेर माणगाव बसस्थानक सुसज्ज होणार

sakal_logo
By

माणगाव, ता. १० (वार्ताहर) : अनेक महिन्यांपासून माणगाव बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली होती. काही महिन्यांपूर्वी दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे होती. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी युवा सेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवल्याने अखेर बसस्थानकाच्या दुरुस्तीला मंजुरी मिळाली. या दुरुस्ती कामाचे कार्यादेश गेल्या आठवड्यात ठेकेदाराला दिले असून अंदाजित १६.५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे लवकर माणगावकरांना सुसज्ज बसस्थानक मिळणार आहे.
यावर्षी माणगाव एसटी बसस्थानकाची अत्यंत बिकट दुरवस्था झाल्याचे प्रवाशांनी पाहिले आहे. ही दुरवस्था लक्षात घेता युवा सेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या नेतृत्वाखाली माणगाव तालुक्यातील युवासैनिक व शिवसैनिक यांनी आक्रमक पवित्रा घेत २२ जुलैला माणगाव शहरात मोर्चा काढून बस-स्थानकातील खड्ड्यात उभे राहून आंदोलन केले. त्या वेळी माणगाव आगारप्रमुखांना खड्ड्यात उभे राहून बसस्थानकाची दुरवस्था, अस्वच्छता आणि खड्डे याविषयी निवेदन दिले होते. या आंदोलनानंतर विपुल उभारे यांनी दुरवस्थेवर उपाययोजना होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्या वेळी महामंडळाकडून मात्र तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.
दीड महिन्यापासून आमदार भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली उभारे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांजवळ सततचा पाठपुरावा केला. त्यामुळे काढलेल्या निविदेच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होऊन २ नोव्हेंबरला अंदाजित १६.५० लाख रुपयांच्या कामाचे कार्यादेश ठेकेदाराला देण्यात आले. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून सुसज्ज बसस्थानक माणगावकरांच्या सेवेत असेल. या कामामुळे माणगाव तालुक्यातील नागरिकांचा बसस्थानकात होणारा त्रास कमी होणार आहे. बसस्थानकातील नियमित स्वच्छतेबाबत प्रशासन, ठेकेदारालाही उभारे यांच्याकडून सूचना करण्यात आली आहे.

दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन माणगाव बसस्थानकात अद्ययावत पाणपोई सुरू करणार आहे. माणगाव बसस्थानक हे स्वच्छ व सुंदर; तसेच प्रवाशांसाठी नेहमीच सुसज्ज राहील, यासाठी आपण कायम तत्पर आणि आग्रही राहणार आहे.
- विपुल उभारे, जिल्हाप्रमुख, युवा सेना