आवळी भोजनाची अनोखी परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवळी भोजनाची अनोखी परंपरा
आवळी भोजनाची अनोखी परंपरा

आवळी भोजनाची अनोखी परंपरा

sakal_logo
By

आवळी भोजनाची अनोखी परंपरा
महिलांची खास पसंती

अजित शेडगे, माणगाव
भारतीय संस्कृतीत अनेक प्रथा परंपरा रूढ आहेत. कार्तिक महिन्यात दीपावलीनंतर कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमा या काळात आवळी भोजनाची खास परंपरा रूढ आहे. या परंपरेचे आजही ग्रामीण शहरी भागात पालन केले जाते. त्याला महिलांची खास पसंती मिळत आहे.

सध्या या प्रथेला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी आवळी भोजनाचा आनंद घेतला जात आहे. या प्रथेनुसार कार्तिक शुक्ल नवमी ते कार्तिक पौर्णिमेच्या कालावधीत आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. आरती करून झाडाला नैवेद्य दाखवतात. त्यानंतर सर्वजण एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतात. कुटुंबातील सर्व नातेवाईक, मित्रपरिवार या खास भोजनासाठी उपस्थित असतात. अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारची ही परंपरा आधुनिक काळातही पाळली जाते. या निमित्ताने आप्त परिवार एकत्रित भोजनाचा व सामूहिक आनंदाचा अनुभव घेत आहेत. कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाला बहर येतो. आवळ्याच्या झाडाची पूजा झाल्यानंतरच आवळा खायला सुरुवात करण्याची पद्धत आहे.

धार्मिक महत्त्व
आयुर्वेदातही आवळ्याच्या झाडाला महत्त्वाचे स्थान आहे. ते एक उत्तम रसायन असून, त्याचा त्रिफळा चुर्णात समावेश होतो. धार्मिक दृष्ट्याही या झाडाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.
आवळी पूजनात आवळ्याच्या झाडाखाली श्री विष्णूची पूजा केली जाते. झाडाच्या बाजूस तुपाचे दिवे लावतात. आवळ्यावर वात लावून झाडाची ओवाळणी केली जाते. तुळशीच्या लग्नातही आवळ्याला महत्त्वाचे स्थान आहे.

आरोग्यदायी अमृतफळ
आवळ्याला अमृतफळ असेही म्हणतात. या झाडाची सावली शांत व आल्हाददायक असते. आवळ्याचा मोरावळा तयार करतात. केस धुण्यासाठी, सेवन करण्यासाठी, बुद्धी, मेधा, तारुण्यासाठ; तसेच पाचक रस तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. आवळ्यात क जीवनसत्व भरपूर असते. त्यामुळे ते आरोग्यदायी फळ आहे.

आवळा हे फळ आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म असलेली वनस्पती आहे. औषधी गुणधर्मामुळे त्याचे महत्त्व कळावे आणि ते दुर्लक्षिले होऊ नये, यासाठी त्याचे पूजन व सहभोजनाची परंपरा आहे. यानिमित्ताने परिवारातील सर्व सभासद एकत्रित येऊन आनंद घेतात.
- मंगल मेहता, सामाजिक कार्यकर्ता, माणगाव