महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये लोकल प्रवाशांची घुसखोरी ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये लोकल प्रवाशांची घुसखोरी !
महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये लोकल प्रवाशांची घुसखोरी !

महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये लोकल प्रवाशांची घुसखोरी !

sakal_logo
By

ठाणे, ता. ५ (वार्ताहर) : ठाणे रेल्वेस्थानकावर आलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लोकल प्रवाशांनी घुसखोरी करत आरक्षण तिकीट काढलेल्या प्रवाशांना आपल्याच आरक्षित जागेवर बसण्याकरता ताटकळत उभे राहिल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान समोर आली. यामध्ये डब्यात शिरण्यासाठी महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला.
सायंकाळच्या वेळेस पिकप अवरला ठाणे लोकलमध्ये असलेल्या गर्दीपासून मुक्तता मिळवण्यासाठी लोकल प्रवासी हे कल्याणपर्यंत विविध स्टेशनवर येणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चढून आपला प्रवास करतात. यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षण केलेल्या लोकांना दाटीवाटीत आपल्याच आरक्षित जागेवर बसावे लागते. कधीकधी उभे राहून लोकल प्रवासी उतरण्याची वाट पाहावी लागते. अशी परिस्थिती ही नित्याचीच आहे; मात्र या समस्येकडे रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे.
गुरुवारी रात्री नियोजित वेळेनुसार ठाणे रेल्वेस्थानकावर महालक्ष्मी एक्स्प्रेस आली. या एक्स्प्रेसमध्ये आरक्षित डब्यात आरक्षित तिकिटे असणाऱ्या प्रवाशांसोबतच कल्याण किंवा त्यापुढे महालक्ष्मी एक्स्प्रेस थांबणाऱ्या थांब्याकडे जाणाऱ्या लोकल प्रवाशांनी या ठिकाणी गर्दी केली. महालक्ष्मी एक्स्प्रेस येताच या एक्स्प्रेसमध्ये लोकल प्रवाशांनी चढण्याकरता झुंबड उडवली. यामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्ध यांना मात्र मोठी कसरत करावी लागली. लोकल प्रवासी डब्यामध्ये चढून आरक्षित जागेवर ठिय्या मांडून बसले. त्यामुळे आरक्षित तिकीट असतानादेखील या प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची नामुष्की ओढावली. सदर माहिती रेल्वे कमिटीचे सदस्य असलेले अमोल कदम यांनी दिली.

.....................
नेहमीचीच कार्यपद्धती
आरक्षित टप्प्यात घुसलेले हे लोकल प्रवासी असून ही त्यांची नेहमीचीच कार्यपद्धती असून विविध एक्स्प्रेस आणि मेलमधून हे लोकल प्रवासी आपल्या इच्छित स्थळी जातात. त्यामुळे आरक्षित असलेल्या नागरिकांना आणि प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. रेल्वेमध्ये असलेले रेल्वे सुरक्षा बल किंवा रेल्वे पोलिस हे साधारणतः कल्याण किंवा त्याच्या पुढच्या स्थानकांनंतर डब्यामध्ये फिरण्यास सुरुवात करतात. त्यामुळे अशा लोकल प्रवाशांचे फावत असल्याचे आरक्षित प्रवासी सांगत आहेत.