साकूर गावात भरते विद्यार्थ्यांची निसर्ग शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साकूर गावात भरते विद्यार्थ्यांची निसर्ग शाळा
साकूर गावात भरते विद्यार्थ्यांची निसर्ग शाळा

साकूर गावात भरते विद्यार्थ्यांची निसर्ग शाळा

sakal_logo
By

संदीप साळवे : जव्हार
आदिवासी आणि दुर्गम भागात प्रगती आणि विकास साध्य करण्यासाठी शिक्षणाशिवाय अन्य कोणते साधन नाही, ही बाब ओळखत ग्रामीण भागातील साकुर गावामध्ये पहिली ते चौथीच्या ४९ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम अरुणा निखंडे या महिला करत आहेत. विशेष म्हणजे अरुणा या सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसामुग्रींचा वापर करून गेल्या वर्षभरापासून अतिशय कल्पकतेने विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण करत आहेत.

साकुर गावातील शिक्षिका अरुणा निखंडे यांनी विशेष परिश्रम घेत विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन बोलावून छोटीशी शाळा सुरू केली आहे. वर्षभरापासून विद्यार्थी या उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी नैसर्गिक वातावरण आणि उपलब्ध असलेली नैसर्गिक सामग्री यांचा वापर करून मुलांमध्ये त्यांनी शिक्षणाची आवड निर्माण केली. यामुळे मुले आकर्षित होऊन रोज शाळेत यायला लागली. बडबड गीते, पाढे, वाचन पद्धती या सगळ्याला निसर्गाची जोड दिल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे.
शबरी सेवा समिती मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी याकरिता जव्हार तालुक्यात जवळपास अशा ३० गावांतील शाळांमध्ये ऑक्टोबर २०२१ पासून हा शैक्षणिक उपक्रम सुरू आहे. गावातील पहिली ते चौथीच्या ४९ विद्यार्थ्यांना सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या खुल्या पटांगणात विद्यार्थ्यांना एकत्र केले जाते. त्यानंतर त्यांना मैदानी खेळ खो-खो, लंगडी, तळ्यात-मळ्यात, मामाचं पत्र हरवले असे खेळ मजेशीर खेळांसह पाढे आणि इतर शैक्षणिक धडे दिले जातात.
.....

माझे शिक्षण होऊ शकले नाही, मला पुढे जाता आले नाही ही खंत मनात होती; परंतु माझ्या भागातील आणि माझ्या गावातील विद्यार्थ्यांना मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करून शैक्षणिकदृष्ट्या विकासाच्या मार्गावर नेऊन ठेवणे, असा ठाम निश्चय करून मी या उपक्रमात सहभागी झाले.
- अरुणा निखंडे, शिक्षिका
.....
शाळेतील पटसंख्या
पहिली : ९
दुसरी : १४
तिसरी : १९
चौथी : ७
...
जन्माष्टमीला पुस्तकांची हंडी
कृष्ण जन्माष्टमीला सर्वत्र दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते, पण या शाळेत जन्माष्टमीला पुस्तकांची हंडी साजरी केली जाते. यात पाच फूट उंचावर एका मडक्यामध्ये चॉकलेट ठेवून अतिशय चांगल्या प्रकारे सजवण्यात येते. तसेच पुस्तकांची दहीहंडी करून या हंडीत ५० पुस्तके ठेवण्यात येतात. त्यानंतर एका विद्यार्थ्याला कृष्ण बनवून हंडी फोडली जाते. त्यानंतर प्रत्येक मुलाला चॉकलेट आणि पुस्तकांचे वाटप करण्यात येते.

शारीरिक शिक्षण देण्यासाठी पाच गावांत पायी प्रवास
भौगोलिकदृष्ट्या साकुर हे गाव अत्यंत दुर्गम ठिकाणी वसलेले आहे. या ठिकाणी चारचाकी वाहन जात नाही. त्यामुळे साकुर गावाशेजारील कडाची मेट, पाथर्डी, आखर या गावांतील विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. यामध्ये हाता-पायांचे व्यायाम प्रकार, उड्या मारणे अशा अनेक गोष्टी शिकवण्यात येत आहेत.

आकाश कंदील व मातीचे दिवे
दिवाळी हा सण अतिशय मोठा आणि महत्त्वाचा आहे. या दृष्टीने मुलांना एकत्र करून कागदाचे आकाश कंदील बनविण्यात आले, तसेच गावात नैसर्गिक स्रोतातून उपलब्ध असलेली माती भिजवून त्यापासून दिवे बनविण्यात आले, रंगांची ओळख व्हावी म्हणून दिव्यांना रंग देण्यात आला.

दगडांच्या रांगोळ्या
विद्यार्थ्यांना एकत्र करीत शालेय पटांगणात किंवा मैदानात लहान-मोठे दगड एकत्र करत दगडांपासून विविध प्रकारच्या दगडांच्या रांगोळ्या शिकवण्यात येत असतात. तसेच बाल आनंद मेळावा यांसारखे उपक्रम घेत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व खाऊचे वाटप करण्यात येते.
....
गणिताचे धडे
विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन एकत्र केले जाते, त्यानंतर त्यांचा वर्गनिहाय गोल करण्यात येतो. आजूबाजूच्या परिसरातील छोटे दगड जमा करून त्यांना दगड मोजणे व दगडांचा वापर करून पाढे शिकविणे व ते विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेणे असे उपक्रम घेतले जात आहेत.
...
मी माझ्या मुलाला अरुणाच्या शाळेत नियमितपणे पाठवीत आहे. यामुळे माझ्या मुलाला चांगले शिक्षण मिळत असून त्याची बुद्धिमत्ता व शिक्षणाची आवड दिवसागणिक वाढत आहे.
- दुर्गा घुटे, पालक
....
मुलांना खुल्या पटांगणात गाणे बोलून, हातवारे करून आणि बडबड गीते, तसेच गोष्टींच्या रूपात शिक्षण दिले जात असल्याने या छोट्या शाळेत मुलांची उपस्थिती चांगली आहे.
- संतोष पवार, पालक