मुंबईतले ८० वर्षांचे तरुण कॉम्रेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतले ८० वर्षांचे तरुण कॉम्रेड
मुंबईतले ८० वर्षांचे तरुण कॉम्रेड

मुंबईतले ८० वर्षांचे तरुण कॉम्रेड

sakal_logo
By

निसार अली ः सकाळ वृत्तसेवा

कॉम्रेड म्‍हटल्‍यावर समोर साम्‍यवाद उभा राहतो. सर्वांना समतेची वागणूक व सामान अधिकार प्राप्त व्‍हावेत यासाठी आतापर्यंत अनेक कॉम्रेड नेते भारतात झाले. मुंबईतही असाच ८० वर्षांचे तरुण कॉम्रेड श्रीधरन हे सम्यवादाचा लाल सूर्य उगवण्याची वाट पाहत एखाद्या तरुणाला लाज वाटेल इतक्‍या उत्साहाने कार्यकरत आहेत.

केरळच्या त्रिस्सूरमधून १९६३ मध्ये कॉम्रेड ए. सी. श्रीधरन मुंबईत नोकरीसाठी आले आणि अल्‍पावधितच मुंबईकर झाले. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ते टायपिंग शिकलेले असल्याने सुरुवातीला त्यांना खासगी कंपनीत टायपिस्ट म्हणून बदलीची नोकरी मिळाली. त्यानंतर राज्य शसनाच्या उपक्रमात एक वर्ष टायपिस्ट म्हणून त्‍यांनी नोकरी केली. त्यापश्चात त्यांना बेस्टमध्ये स्टेनो म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी १९६४ मध्ये ट्राफिक मॅनेजरच्या स्वीय सचिव या पदावर काम केले. त्यानंतर त्यांना बढतीची संधी आली; मात्र साम्यवादी पक्षावर निष्ठा आणि विचारांमुळे त्यांना अधिक वेळ पक्षसंघटना तसेच समाजकार्याला द्यायचा होता म्हणून त्यांनी बढती न घेता त्याच पदावर कार्य करण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले; मात्र त्यातही ते खूश होते.
यादरम्यान त्यांनी सीपीएमप्रणित सीआयटीयू या कामगार संघटनेचे काम सुरू केले. तेव्हापासून आजपर्यंत वयाची ८० वर्षे उलटल्‍यावरही ते समाजाच्या समस्या व प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा देतात. १९७७ आणीबाणीच्या काळात ते अधिक सक्रिय झाले. त्‍यांनी सातत्याने सामान्यांच्‍या तसेच कामगारांच्‍या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली आहेत. सध्‍या त्‍यांची प्रकृती ठीक नसतानाही ते पक्षाच्या बैठकीत, कार्यक्रमांत सहभागी होतात. वेळेला रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. नुकतेच रेशनच्या विषयावर बोरिवली तहसीलदार कार्यालयावर त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

विविध पदांवर कार्यरत
१९७० मध्‍ये साधारण सीपीएम पक्षाचे सदस्य ते मालवणी सेक्रेटरी अशा पदांवर त्‍यांनी कार्य केले आहे. सध्‍या ते पश्चिम उपनगर तालुका कमिटीचे सेक्रेटरी आहेत.

लाल सूर्य उगवणार
विविध आंदोलनांदरम्‍यान कॉम्रेड ए. सी. श्रीधरन जेलमध्ये गेले. मुंबई बंद केल्याने त्यांना पोलिसांनी अटकही केली होती. ते आजही सकारात्मक वृत्ती ठेवून लढत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की जरूर एक दिवस लाल सूर्य उगवणार व समाजात सर्वांना समतेची वागणूक व समान अधिकार प्राप्त होतील. एकीकडे साम्यवादी पक्षाचे वर्चस्व नगण्य झाले असताना कॉम्रेड श्रीधरन हे लाल झेंडा घेऊन वयाच्या ८० व्या वर्षी साम्यवादाचा लाल सूर्य उगवण्याची वाट पाहत आहेत. त्यांना दोन मुले आहेत, तसेच काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे.