विक्रमगडमध्ये भात मळणीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये भात मळणीला वेग
विक्रमगडमध्ये भात मळणीला वेग

विक्रमगडमध्ये भात मळणीला वेग

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) : ढवळ्या-पवळ्यांना एकत्र करून पुन्हा एकदा शेतावरील खळ्यांत भात झोडणीने वेग घेतला आहे. सद्यस्थितीत विक्रमगड तालुक्यातील बहुतेक भातकापणीची कामे आटोपली आहेत. त्यामुळे आता शेतकरी भात झोडणीच्या कामांना लागला आहे. आजच्या आधुनिक युगात विविध यंत्रांचा शेती क्षेत्रात वापर केला जात असतानाही विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पारंपरिकता जपून भात झोडणीची-मळणीची कामे केली जात आहे.
विक्रमगडसारख्या ग्रामीण भागात मुखत्वेकरून आदिवासी वाड्या-वस्त्यांमध्ये मळणीची कामे पारंपरिक पद्धतीनेच केली जात आहेत. तालुक्यातील भातशेती कापणीची कामे जवळपास पूर्ण झाली असून ७ हजार ८५८ हेक्टर क्षेत्रातील गावागावांत तयार भातपीक कापून आपल्या शेतामध्ये असलेल्या खळ्यावर साठविले जाते. त्यानुसार भात पिकाच्या मळणीची कामे सुरू झाली आहेत. दिवस मावळतीला जाताच शेतावरील खळ्यांमधून पारंपरिक गाणी गात शेतांमध्ये मळणीची काम जोमाने सुरू आहे.
कापणी केलेल्या भाताच्या पेंढ्या झालेल्या असल्या तरी काही प्रमाणात पेढींला भात शिल्लक राहतो. शेतावर किंवा घराजवळ यासाठी पारंपरिक खळे राखून ठेवलेले असते. या खळ्यांभोवती झोडलेल्या भाताच्या काड्यांपासून उडवी (ढीग) रचली जातात. खळ्याच्या मध्यभागी लाकडाचा खांब पुरण्यात येतो. लहान मुले गवतात नाचण्याचा आनंद लुटण्यासह जनावरांना हाकलण्याचे काम उत्साहाने करतात. भात कापणी हंगामापर्यंत हे गवत जनावरांना सुका चारा म्हणून वापरले जाते.
...
विशेष मेजवानी
विक्रमगड येथील जाणकार शेतकरी कांतीकुमार पाटील यांनी सांगितले, मळणीच्या काळात शेतावर खास गावठी कोंबड्यांचा झणझणीत रस्सा, नव्या तांदळाची भाकरी अशी मेजवानीचे आयोजन केले जाते. त्यामुळे सामूहिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या या मळणींच्या कामात सर्वांमध्ये उत्साह असतो.
..
विक्रमगड : शेतावर भात झोडणी करताना शेतकरी.