मंगळसूत्राची बदलती फॅशन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळसूत्राची बदलती फॅशन!
मंगळसूत्राची बदलती फॅशन!

मंगळसूत्राची बदलती फॅशन!

sakal_logo
By

शुभांगी पाटील, तुर्भे
सध्या मंगळसूत्राची फॅशन नवनवीन रूपाने पुढे येत आहे. स्त्रिया गळ्यात मंगळसूत्र घालत नसल्या तरी सेलिब्रिटी मंडळींच्या मंगळसूत्रांची फॅशन अगदी सर्रास फॉलो केली जाते!

मंगळसूत्र, हिरवा चुडा, लाल कुंकू, जोडवी असे दागिने स्त्रियांसाठी सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. विवाहित स्त्रीने तर हे सगळे दागिने घालावेतच, असा काही जणांचा अट्टहास असतो. पूर्वीच्या काळातील स्त्रिया तर एकदा का लग्न झाले की विवाहित कायमस्वरूपी दागिने घालायच्या. आताच्या काळात इतर दागिन्यांसोबत सौभाग्य अलंकार मध्येही अनेक प्रकार किंवा अनेक प्रकारच्या डिझाइन्स पाहायला मिळत आहेत. कुठलाही सणवार असो किंवा व्रत वैकल्य, एखादा समारंभ असो स्त्रिया दागिन्यांना खूप महत्त्व देतात. त्यातल्या त्यात सौभाग्यालंकारातील महत्त्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र.
या मंगळसूत्रामध्येही अनेक प्रकार बघायला मिळतात. पूर्वी फक्त मोठे मंगळसूत्र व मुहूर्तमणी एवढेच असायचे. आता आकर्षक दिसणारे लहान मंगळसूत्र, वेगळ्या डिझाइन्सचे मंगळसूत्र बाजारात बघायला मिळतात. स्त्रियादेखील सर्रासपणे यांचा वापर करतात. या मंगळसूत्राकडे फक्त सौभाग्यालंकार म्हणूनच नाही, तर सौंदर्य वाढवणारा अलंकार म्हणूनही सध्या पाहिले जाते.

वाटी मंगळसूत्र
वाटी मंगळसूत्र ही खूप सामान्य डिझाईन आहे. वाट्यांचे मंगळसूत्र हे प्रत्येक स्त्रीकडे असतेच. हे मंगळसूत्र लांबीला लहान किंवा मोठे कसेही असू शकते. फक्त यामध्ये सिंगल वाटी आणि डबल वाटी असे प्रकार असतात. वाटीच्या डिझाईन्समध्येही आपल्याला विविधता बघायला मिळते. जसे की वाटीमध्ये शिंपल्यांचा आकार, फुलाचा आकार किंवा वाटीच्या आकारातच बदल केलेला दिसून येतो.

कोल्हापुरी मंगळसूत्र
कोल्हापुरी मंगळसूत्र हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. हे मंगळसूत्र थोडे वेगळे असते. यात विशेष म्हणजे कोल्हापुरी साजमध्ये जसे पेंडट असते; तसेच मंगळसूत्रात लावलेले असते. या पेंडेंटसोबत काळ्या मण्यांची सर असते. ही सर अगदी दोन ते सहा सरींपर्यंत असू शकते. हे मंगळसूत्र गळ्यालगत असेल तर ते आणखी सुंदर दिसते.

साखळी मंगळसूत्र
मित्रांनो, बऱ्याच स्त्रियांना खूप जास्त काळे मणी असलेले मंगळसूत्र घालायला आवडत नाही. अशा वेळी तुम्ही साखळी मंगळसूत्र घालू शकता. यात वाट्या किंवा पेंडंट करता येते. पेंडंटच्या आजूबाजूला फार कमी काळे मणी असतात. त्यामुळे ते इतर कोणत्याही कपड्यावर वापरतो येते.

पेशवाई मंगळसूत्र
मंगळसूत्राचा हा आणखी एक वेगळा प्रकार आहे. हा प्रकार कोल्हापुरी साजसारखा दिसतो. तसेच दिसायला थोडासा तन्मणी सारखा दिसतो. कारण तन्मणीमध्ये असणारे थोडे लांब पेंडंट यामध्ये असते. या पेशवाई मंगळसूत्राला काळ्या मण्यांची सर असते. मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्येही वेगवेगळे प्रकारचे डिझाइन्स बघायला मिळतात. कधी कधी इतर रंगाचे स्टोन्सही लावले जातात.

बोल्ड साखळी मंगळसूत्र
नावाप्रमाणेच हे मंगळसूत्र दिसायला अगदी भारदस्त असते. याची साखळी जाड असल्यामुळे ते लांब व ठसठशीतपणे दिसते. आजकाल अनेक स्त्रिया साडीवर इतर दागिने घालण्यापेक्षा या मंगळसूत्राला घालणे जास्त पसंत करतात.

सहा पदरी मंगळसूत्र
सहा पदरी मंगळसूत्र बोल्ड साखळी मंगळसूत्रापेक्षा जास्त मोठे दिसते. आगरी आणि कोळी स्त्रिया या प्रकारचे मंगळसूत्र घालतात. हे इतर मंगळसूत्रापेक्षा वेगळे आणि ठसठशीत असते. याचे पेंडेंटही खूप मोठे व भक्कम असतात. यामध्येही खूप प्रकारच्या डिझाइन्स पाहायला मिळतात.

डायमंड मंगळसूत्र
स्त्रियांना आपल्याकडे एक तरी हिरा असावा, असे वाटत असते. तसेच बऱ्याच स्त्रियांना रोज घालण्यासाठी असे मंगळसूत्र हवे असते, जे वेगळे आणि सुंदरही दिसेल. अशा स्त्रियांसाठी डायमंड मंगळसूत्र हा प्रकार खूप योग्य आहे. यामध्ये साखळी किंवा काळ्या मण्यांच्या सरींमध्ये छोटे आकाराचे गोल किंवा चौकोनी हिऱ्याचे पेंडेंट बनवू शकता. आजच्या काळात डायमंड मंगळसूत्राची तरुण स्त्रियांमध्ये खूप क्रेझ आहे. कारण त्यामुळे क्लासी लूक येतो.

डायमंड वाटी मंगळसूत्र
तुम्हाला जर वाटी मंगळसूत्र आवडत असेल, तर तुम्ही त्यात डायमंडचा विचार करू शकता. डायमंड वाटी मंगळसूत्र दिसायला खूपच सुंदर आणि ट्रेंडी दिसते. यामध्ये लहान किंवा मोठे असे मंगळसूत्र करू शकता. यात डायमंडच्या वाट्याचा आकार लहान मोठा सुद्धा बनवून घेऊ शकता.

नावांचे मंगळसूत्र
बऱ्याच स्त्रियांना तेच तेच चालत आलेले मंगळसूत्र नको असते. काहीतरी वेगळे म्हणून त्यांना नवऱ्याच्या नावाचे पहिले अक्षर घेऊन पेंडंट बनवायला आवडते. याशिवाय फक्त नावांचे आद्याक्षर न घेता पूर्ण नावाचे पेंडेंटही बनवून घेऊ शकता. या प्रकारचे मंगळसूत्र दिसायला अतिशय सुंदर आणि रिच दिसतात. हे मंगळसूत्र शक्यतो साखळीमध्ये बनवले जाते.

हार्ट पेंडेंट मंगळसूत्र
तुम्हाला जर जुने पेंडेंट असलेले मंगळसूत्र नको असेल, तर तुम्ही हा प्रकार नक्की निवडू शकता. या प्रकारच्या मंगळसूत्रात हार्ट शेपचे पेंडेंट असते. हे पेंडेंट तुम्हाला डायमंडमध्ये किंवा सोन्यामध्येही बनवून घेता येते. अशा प्रकारचे पेंडेंट तुम्ही मालिकांमध्ये किंवा चित्रपटा नक्की पाहिले असेल. हे दिसायला खूपच आकर्षक व नाजूक दिसते. त्यामुळे ते कोणत्याही कपड्यांवर घालू शकतात. अगदी पंजाबी ड्रेस किंवा जीन्स टॉपवर सुद्धा घालू शकता.