रस्ता गुणवत्तेसाठी कठोर पावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता गुणवत्तेसाठी कठोर पावले
रस्ता गुणवत्तेसाठी कठोर पावले

रस्ता गुणवत्तेसाठी कठोर पावले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः मुंबईत सुरू असलेल्या डांबरी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेने अधिक कडक अशी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार केली आहे. प्रत्येक ५० मिनिटांमध्ये आता बिटुमन (डांबराचा) नमुना घेऊन नामांकित संस्थांकडे चाचणीसाठी पाठवावा लागणार आहे. आयआयटी मुंबई, व्हीजेटीआय तसेच केंद्र सरकारच्या संस्थांकडून गुणवत्ता चाचणी तपासणी करणे गरजेचे असणार आहे. त्यामध्ये निविदा प्रक्रियेनुसार बिटुमनचे प्रमाण योग्य आहे का याची पडताळणी या एसओपीअंतर्गत अपेक्षित आहे. गुणवत्ता परीक्षणामध्ये जर बिटुमनचे प्रमाण अयोग्य आढळले, तर कंत्राटदाराला पैसे न देणे, काळ्या यादीत टाकणे तसेच अस्फाल्ट प्लान्टच्या मालकाची नोंदणी रद्द करणे यांसारखी कारवाई करण्यात येणार आहे.

एखाद्या रस्त्याच्या बांधकामात बिटुमनची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. रस्त्याच्या बांधकामातील मिश्रणामध्ये बिटुमनची योग्य मात्रा ही दर्जेदार रस्ता निर्मितीसाठी कारणीभूत ठरते. तसेच रस्त्यावर खड्डे पडण्याचेही प्रमाण यामुळे कमी होते. म्हणूनच पालिकेने उशिरा का होईना, परंतु अस्फाल्ट प्लांटवर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली आहेत. नव्या एसओपीनुसार जर चाचणीमध्ये बिटुमनची श्रेणी आणि टक्केवारी योग्य प्रमाणात न आढळल्यास कंत्राटदाराला त्या २५ मीटर रस्त्यासाठी कोणतेही पैसे देण्यात येणार नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंसाठी हा निकष कायम असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्त्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाइतकीच दंडाची आकारणी कंत्राटदाराला करण्यात येईल, असे रस्ते विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पालिकेला रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेसाठी याआधीच पत्र लिहिले होते. रस्त्याच्या गुणवत्ता सुधारणेसाठी अधिक सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, असे पत्रात त्यांनी नमूद केले होते. तसेच मोठ्या प्रमाणात तपासणी करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी याआधीच मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये ४०० किलोमीटरच्या सिमेंट काँक्रीटचे रस्ते पालिकेने तयार करण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली होती, परंतु कमी प्रतिसादाअभावी ही निविदा प्रक्रिया बारगळली.